जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)
जागतिक स्तरावर डॉलरच्या तुलनेने रुपयाची घसरण सुरू असून, चलन बाजारात एका डॉलरच्या तुलनेत जवळपास 83 रुपयांच्या खाली दर घसरून,सरतेशेवटी 83.16 रुपयांवर स्थिरावला.रिझर्व बँक ऑफ इंडियाने जागतिक बाजारपेठेत डॉलरच्या तुलनेत होत असलेल्या रुपयांच्या घसरणीनंतर, सरकारी बँकांमार्फत डॉलरची विक्री केली असून, रुपयाची घसरण रोखण्यासाठी रिझर्व बँक ऑफ इंडियाने हस्तक्षेप केला आहे. दरम्यान विदेशी गुंतवणूकदार,भारतीय शेअर बाजारात सातत्याने विक्री करत असल्यामुळे,डॉलरच्या तुलनेत रुपया अतिशय कमजोर अवस्थेत पोहोचला आहे.
डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण अशी चालू राहिली तर, निश्चितच भारताच्या दृष्टीने ही बाब चांगली नाही. रुपयाच्या तुलनेत डॉलर महागल्यास ,भारतात वस्तूंची आयात करणे महाग होऊ शकते. कच्च्या तेलासह खाद्यतेले,इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आदी आयात होणाऱ्या वस्तूंना जास्त किंमत मोजावी लागू शकेल,शिवाय परकीय चलनाच्या साठ्यात देखील घट होऊन, व्यापारी तूट व चालू खात्यातील तूट वाढू शकते. एकंदरीतच डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण अशीच चालू राहिली तर, भारतीय बाजारपेठेवर याचा निश्चितच परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.