जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
जालना येथे मराठा आरक्षण आंदोलकांच्यावर केलेल्या लाठीमार प्रकरणी 3 पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले असून,मराठा आंदोलकांवरील दाखल केलेले सर्व गुन्हे मागे घेण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी केली आहे.दरम्यान जालना येथे मराठा आरक्षणासाठी उपोषणास बसलेले कार्यकर्ते मनोज जरांगे- पाटील हे आज मंगळवारी दुपारी,राज्य शासनाच्या आश्वासनावर उपोषण मागे घ्यायचे का नाही? याबाबतीत आपला निर्णय जाहीर करणार आहेत.मराठा समाज बांधवांच्या आरक्षणासाठी जालन्यात उपोषणास बसलेले मनोज जरांगे- पाटील यांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर,राज्य शासनाने काल सर्वपक्षीय बैठक बोलावली होती.काल झालेल्या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी पत्रकार परिषदेत,आंदोलकांवर केलेल्या लाठीमार प्रकरणी 3 पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचा निर्णय व मराठा समाजाला टिकणारे भक्कम आरक्षण देण्यासाठी, सर्व काही करण्याची तयारी असल्याचे आश्वासन,मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी दिले आहे. सह्याद्री अतिथीगृहात सुमारे 3 तास चाललेल्या बैठकीत,आंदोलकांवर दाखल केलेले सर्व गुन्हे मागे घेण्यावर निर्णय घेण्यात आला असून,सदर बैठकीला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभेतील विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार,विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्यासह महाराष्ट्र मंत्रिमंडळातील विविध खात्याचे मान्यवर मंत्री महोदय उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्यातील सध्यपरिस्थितीत, माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली गठीत केलेल्या समिती थोडा वेळ देऊन,राज्यातील जाती- जमातीमध्ये तेढ निर्माण होऊ न देता, कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी ही सरकारची भावना असल्याचे व आंदोलन कर्ते मनोज जरांगे- पाटील यांनी जालन्यातील उपोषण मागे घ्यावे असे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी केले आहे. दरम्यान विधानसभा विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी मराठा समाजाला,ओबीसी मधून आरक्षण मिळणार नसल्याचे शासनाने स्पष्ट केल्याची माहिती दिली आहे. एकंदरीत जालन्यातील मराठा समाजाच्या आरक्षणासाठी उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या पुढील भूमिकेवर सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.