जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)
सांगलीतील यंदाच्या गणेशोत्सवाच्या काळात,कायदा हातात घेणाऱ्यांची गय करू नका असे सक्त आदेश जिल्हा पोलीस प्रमुख डॉ.बसवराज तेली यांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिले आहेत. यंदाच्या वर्षीच्या गणेशोत्सवाच्या काळात कुठेही गालबोट लागता कामा नये,सांगलीतील सराईत गुन्हेगारांवर कारवाई करण्यात यावी व शिवाय 3 पेक्षा जास्त गुन्हे दाखल असणाऱ्या गुन्हेगारांच्यावर तडीपाराची कारवाई करण्यात यावी. सांगली जिल्ह्यातील 25 पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने,सराईत गुन्हेगारांच्यावर जास्तीत जास्त कारवाई करावी,तसेच संबंधित गुन्हेगारांना ताब्यात घेऊन,प्रतिबंधात्मक कारवाईची नोटीस बजावण्यात यावी. सांगलीतील यापूर्वी झालेले खून,खुनाचा प्रयत्न,मारामाऱ्या,बेकायदा हत्यार बाळगून दहशत माजवणे असे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या 10,225 गुंडांची यादी तयार करण्यात आली असून, या सर्व गुन्हेगारांना, संबंधित पोलीस ठाण्यात बोलवून,प्रतिबंधात्मक अटकेची कारवाई केली जात आहे.सांगली जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांअंतर्गत असलेल्या गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांच्या बैठका चालू असून, जिल्ह्यातील सर्व गणेश मंडळांना तात्पुरते सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका क्षेत्रात आणखी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे नियोजन करण्यात आले असून,सांगली जिल्ह्याच्या बाहेरील जिल्ह्यातून योग्य तो पोलिस बंदोबस्त मागवण्यात आला आहे.
दरम्यान सांगलीतील यंदाच्या वर्षीच्या गणेशोत्सवाच्या काळात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, जवळपास 1 अप्पर पोलीस अधीक्षक,7 पोलीस उपाअधीक्षक,23 पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक- उपनिरीक्षक 100,पोलीस कॉन्स्टेबल 1800, होमगार्ड 1200,एस.आर. पी. एफ. तुकडी जवान 100 असा पोलीस फोर्स बंदोबस्तासाठी ठेवण्यात आलेला आहे.यंदाच्या वर्षीच्या गणेशोत्सवात कोणतीही अप्रिय घटना घडू नये व कायदा व सुव्यवस्था स्थिती चोख राहावी,यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेतली असल्याचे, आजच्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बोलावलेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिसून आले.