- निधीसाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करणार.
जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अजित निंबाळकर)
श्री क्षेत्र जोतिबा प्राधिकरणाचा विकास करताना कोल्हापूरची परंपरा, बाज राखला जाईल, अशा पद्धतीने आराखडा तयार करण्यावर भर द्यावा, अशा सूचना पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केल्या.
श्री क्षेत्र जोतिबा प्राधिकरण विकास आराखडा तयार करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने संकल्पना स्पर्धा (आयडिया कॉम्पिटीशन) घेण्यात आल्या होत्या. यामध्ये अंदाजे 1600 कोटी रुपयांचे आराखडे सहभागी स्पर्धकांनी तयार केले असून या आराखड्यांचे सादरीकरण पालकमंत्री श्री.केसरकर यांनी पाहिले.तसेच येथे होणाऱ्या विविध विकास कामांविषयी चर्चा करुन सूचना केल्या.यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता शामराव कुंभार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, जिल्हा नियोजन अधिकारी विजय पवार,कार्यकारी अभियंता चंद्रकांत आयरेकर,उपअभियंता सचिन कुंभार तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री.केसरकर म्हणाले,जोतिबा प्राधिकरणाचा अंतिम आराखडा निश्चित झाल्यानंतर येथील विकास कामे करताना दगडी बांधकामावर भर द्या. मराठा वास्तूशैलीचा वापर करा. कोल्हापूरी परंपरा प्रतीत होईल, अशा पद्धतीने आराखडा तयार करावा,असे सांगून यासाठी आवश्यक निधीची तरतूद होण्यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.