जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
सांगली येथील वसंतदादा शासकीय रुग्णालयात ५०० खाटांची क्षमता असलेली सुसज्ज इमारत,निवासी डॉक्टरांसाठी तीन मजली इमारत,अद्ययावत शवागार उभारणीला महाविकास आघाडी काळातच प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. त्यासाठीची २३३ कोटींची आर्थिक तरतूद हिवाळी अधिवेशनाच्या पुरवणी अर्थसंकल्पात केली जाईल,अशी ग्वाही वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांना दिली.
श्री.पाटील यांनी मंत्री मुश्रीफ यांची मुंबईत मंत्रालयात भेट घेतली.सांगली सिव्हिल रुग्णालयावर रुग्णसंख्येचा असलेला ताण,औषधांच्या पुरवठ्यातील अनियमितता,मनुष्यबळाची कमतरता,अत्याधुनिक यंत्रणांच्या सज्जतेबाबत त्रुटी,नव्या इमारतींची गरज या बाबींवर सविस्तर विवेचन केले. महाविकास आघाडीची सत्ता असताना त्यांनी केलेल्या मागणीला प्रतिसाद देत तत्कालीन वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी मंजूर केलेल्या कामांच्या प्रशासकीय मान्यतेची कागदपत्रे दाखवली.आता तातडीने निधी द्यावा,त्याची हिवाळी अधिवेशनातच तरतुद करावी,अशी मागणी केली.श्री.मुश्रीफ यांनी वैद्यकीय सुविधांबाबत हलगर्जीपणा होणार नाही,अशी ग्वाही देतानाच श्री.पाटील यांच्या पत्रावर वैद्यकीय शिक्षण प्रधान सचिवांना ‘विनंतीनुसार तातडीने प्रस्ताव सादर करावा’, अशा सूचना दिल्या.
पृथ्वीराज पाटील यांनी सांगितले,की माझ्या मागणीनुसार महाविकास आघाडी सरकारने ५०० खाटांची क्षमता असलेली इमारत,निवासी डॉक्टरांसाठी तीन मजली इमारत, अद्ययावत शवागार मंजूर केले आहे.२९ जून २०२२ रोजी या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली,मात्र त्यासाठी अर्थसंकल्पीय तरतूद लांबली होती.श्री.हसन मुश्रीफ यांच्याशी माझे स्नेहबंध आहेत.त्यामुळे हक्काने त्यांना या कामासाठी आग्रह करता आला.त्यांनी त्याची दखल घेतली आणि हिवाळी अधिवेशनात तरतूद केली जाईल,अशी ग्वाही दिली.
मुश्रीफ सोमवारी दौऱ्यावर.
वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी वसंतदादा शासकीय रुग्णालयातील परिस्थितीची स्वतः पाहणी करावी.येथील औषध तुटवडा,सीटी स्कॅन यंत्रणा,शवागार,अन्य इमारतींची अवस्था आणि अपुरे मनुष्यबळ याबाबत आढावा घ्यावा. त्याशिवाय यंत्रणा गतीमान होणार नाही,अशी अपेक्षा पृथ्वीराज पाटील यांनी व्यक्त केली.त्यावर श्री.मुश्रीफ यांनी सोमवारी (ता.२३) सांगलीत येवून आढावा घेण्याचे मान्य केले.