जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
भारत-पाक सीमेवर श्रीनगर येथे कुपवाडा परिक्षेत्रात,छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसवण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगुंटीवार यांनी सांगितले.सदरहू भारत-पाक सीमेवर श्रीनगर मधील कुपवाड क्षेत्रात,शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसवण्याचा प्रस्ताव,"मी पुणेकर" या संस्थेने दिला असून,महाराष्ट्र शासन या प्रकल्पासाठी सर्वतोपरी मदत करणार आहे,अशी माहितीही महाराष्ट्र राज्याचे वने,सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगुंटीवार यांनी दिली.
लंडन येथे छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखें परत आणण्यासंबंधीच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केल्यानंतर, परत आज नागपुरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आल्यावर त्यांनी वरील माहिती दिली.आज नागपूर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर,नागपूर- वर्धा- चंद्रपूर जिल्ह्यातील भाजप कार्यकर्ते व शिवभक्तांनी मोठ्या प्रमाणावर त्यांचे स्वागत केले.
महाराष्ट्र राज्याचे मंत्री मुनगुंटीवार यांनी सांगितले की,भारत पाकिस्तान सीमेवर,छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारल्यामुळे,पुतळा पाहून पाकिस्तानला नक्कीच धडकी बसेल.भारतीय वंशाचे जवळपास 16 खासदार हे ब्रिटिश संसदेत असून,लंडनमध्ये सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसवण्यात येणार आहे,शिवाय ब्रिटिश सरकारकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास,आवश्यक ती लागणारी जागा उपलब्ध होऊन मिळण्यासाठी प्रस्ताव दिला आहे.महाराष्ट्र सरकार,स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून हा पुतळा बसवणार असल्याचे राज्याचे मंत्री सुधीर मुनगुंटीवार यांनी स्पष्ट केले.