जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अजित निंबाळकर)
पुरातत्व विभागाकडे असलेल्या कोल्हापूर जिल्हयातील महत्त्वाच्या पर्यटन ठिकाणांसाठी यात आराध्य दैवत श्री अंबाबाई मंदिर,जोतिबा मंदिर तसेच रांगणा,पन्हाळा, विशालगड, व पारगड किल्ला इ.साठी ९०० कोटी रूपयांची मागणी केंद्र शासनाकडे करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.या निधीतून त्या ठिकाणांचे जतन,संवर्धन,दुरूस्ती व परिसर विकासासाठी कामे केली जाणार आहेत.याबाबत सोमवार दि.१६ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राहूल रेखावार व पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली.केंद्राकडे असलेल्या व पुरातत्व विभागाकडून संवर्धन होत असलेल्या या ठिकाणांचा संवर्धन आराखडा तयार केला जात असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.ते म्हणाले,पुरातत्व विभागाकडून यासाठी वास्तुविशारद यांची नेमणुक करण्यात आली आहे.या बैठकीला जिल्हाधिकारी राहूल रेखावार,पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत,जिल्हा नियोजन अधिकारी विजय पवार,सहायक संचालक पुरातत्व विभाग,डॉ.विलास वहाणे,पुरातत्व विभागाच्या वास्तुविशारद स्मिता कासार पाटील,वैदही खेबुडकर,प्रियंका दापोलीकर उपस्थित होत्या.
केंद्र शासनाकडे असलेली जिल्हयातील मंदिरे व गडकिल्ले याबाबत येत्या ४ नोव्हेंबरला पर्यटन विभागाचे केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक कोल्हापूर येथे येणार आहेत.ते गोवा येथील असून त्यांची नाळ कोल्हापूरशी जुळलेली असल्याचे मुश्रीफ यांनी यावेळी सांगितले.ते आल्यानंतर ९०० कोटींच्या कामाबाबत त्यांना सादरीकरण करणार आहे.त्यांनी यापुर्वी तो निधी देणार असल्याचे जाहीर केले होते.यामुळे जिल्हयातील संपुर्ण पर्यटनाचा विकास होईल व जगाच्या पर्यटनात कोल्हापूर जिल्हयाचे नाव येईल असे प्रतिपादन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी या बैठकीत केले.
इतर महत्त्वाच्या ६ राज्य स्मारकांच्या संवर्धनासाठी जिल्हा नियोजन मधील १३.५२ कोटी रूपयांना तांत्रिक मान्यता.!
कोल्हापूर जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत राज्य संरक्षित स्मारकांची जतन व दुरूस्तीसाठी १३.५२ कोटी रूपयांना तांत्रिक मंजूरी देण्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे.येतील दोन स्मारकांची तांत्रिक मंजुरी मिळाली असून उर्वरित पाच प्रस्तावांची तांत्रिक मंजुरी येत्या दोन ते तीन दिवसात मिळणार आहे.पांडवदरा लेणी मसाई पठार ६४.७९ लक्ष,महादेव मंदिर मौजे आरे १.५० कोटी,भुदरगड किल्ला ३.८९ कोटी,लक्ष्मी विलास पॅलेस ९३ लक्ष,रांगणा किल्ला भुदरगड ४.२८ कोटी आणि विशालगड व बाजीप्रभु देशपांडे समाधी,गजापूर करीता २.२८ कोटी अशा १३.५२ कोटींच्या कामांचा समावेश आहे. यानंतर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी जोतिबा मंदिर डोंगर ते पन्हाळा किल्ला यादरम्याने प्रस्तावित रोप वे चे सर्वेक्षण करून अंदाजपत्रक सादर करण्याचे निर्देश दिले.याबाबत जोतिबा मंदिर विकास आराखड्यात रोपवे चा समावेश करण्यात येणार आहे.तसेच पन्हाळा ते विशालगड दरम्यान ट्रेकींग मार्गावर आवश्यक सोयीसुविधा व साईन बोर्ड लावणेबाबतही सूचना त्यांनी केल्या.