- सांगली जिल्ह्यातील सांगली,मिरज व किर्लोस्करवाडी ही तिन्ही रेल्वे स्टेशन व्यापारी केंद्रे बनणार.
- सांगलीची प्रसिद्ध हळदी पावडर,गूळ व भडंग रेल्वे द्वारे देशाच्या विविध भागात पोहोचणार.
- तासगावचे प्रसिद्ध द्राक्षे व बेदाणे आता देशाच्या विविध भागात प्रवासी रेल्वे द्वारे पोहोचणार.
जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
मोदी सरकारने देशात अनेक रेल्वे स्टेशनवर थांबणाऱ्या असंख्य रेल्वे गाड्यांत प्रवास करणाऱ्या कोट्यावधी लोकांना त्या त्या शहरातील प्रसिद्ध उत्पादने व खाद्यपदार्थ रेल्वे स्टेशनवरच खरेदी करता यावे तसेच देशातील युवकांना व्यवसाय व रोजगाराची संधी मिळावी यासाठी "वन स्टेशन वन प्रॉडक्ट" ही योजना राबवली आहे.वन स्टेशन वन प्रोडक्ट योजनेअंतर्गत सांगली जिल्ह्यातील सांगली, मिरज,किर्लोस्करवाडी या 3 प्रमुख रेल्वे स्टेशनवर सांगली जिल्ह्यातील प्रसिद्ध उत्पादने व खाद्यपदार्थ विक्री करण्याचे स्टॉल टाकता यावे ही विनंती खासदार संजय काका पाटील यांनी मध्य रेल्वेकडे केली.खासदारांची ही मागणी मान्य करत मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने सांगली,मिरज व किर्लोस्करवाडी या तिन्ही रेल्वे स्टेशनवर "वन स्टेशन वन प्रॉडक्ट" योजना राबवण्याची मंजुरी दिली आहे.
सांगली जिल्ह्यात सांगली रेल्वे स्टेशनवर सुमारे 50 रेल्वे गाड्या थांबतात,मिरज जंक्शन रेल्वे स्टेशनवर सुमारे 70 रेल्वे गाड्या थांबतात. व किर्लोस्करवाडी रेल्वे स्टेशनवर सुमारे 15 रेल्वे गाड्या थांबतात.सांगली स्टेशनवर थांबणाऱ्या गाड्यांमध्ये सुमारे 40 हजार प्रवासी बसलेले असतात.त्यांना सांगली स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर व रेल्वेच्या डब्यामध्ये जाऊन देखील माल विक्री करता येणार आहे.मिरज रेल्वे स्टेशनवर थांबणाऱ्या रेल्वे गाड्यांमध्ये सुमारे 50 हजार प्रवासी बसलेले असतात.या प्रवाशांना प्रसिद्ध उत्पादने व खाद्यपदार्थ विक्री करता येणार आहे.
एकूणच सांगली जिल्ह्यातील या तीन रेल्वे स्टेशनवर एक बाजारपेठच उभी राहणार आहे व हे तीन रेल्वे स्टेशन एक व्यापाराचे केंद्र बनतील अशी आशा खासदार संजय काका पाटील यांनी व्यक्त केली.सांगली जिल्ह्यातील व्यापार व उद्योगांना भरभराटी येईल व वार्षिक कोट्यावधी रुपयांची उलाढाल या तीन रेल्वे स्टेशनवर होईल.सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील वन स्टेशन वन प्रॉडक्ट या योजनेचा खूप मोठा फायदा होणार आहे असे जाणकारांनी मत व्यक्त केले आहे.सांगली जिल्ह्यातील या तीन रेल्वे स्टेशनवर उभारलेऱ्या "वन स्टेशन वन प्रॉडक्ट" नावाच्या बाजारपेठेवरून सांगली जिल्हा तसेच देशातील प्रवाशांनी भरपूर खरेदी करावी असे आवाहन रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य सुकुमार पाटील व उमेश शहा यांनी केले.व खासदारांचे अभिनंदन केले.