जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
विधिमंडळाचे अधिवेशन तातडीने बोलावून मराठा समाजाला हक्काचा आरक्षण द्या,कोणत्याही परिस्थितीत मराठा समाजाला अर्धवट आरक्षण दिलेले स्वीकारणार नसून,या कारणासाठी पाणीसुद्धा पिण्याचे बंद करणार असल्याचा इशारा आंदोलन कर्ते मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.
दरम्यान महाराष्ट्र राज्यातील सध्याच्या उद्भवलेल्या हिंसक परिस्थितीवर गुन्हे दाखल करण्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या पार्श्वभूमीवर,आंदोलन कर्ते मनोज जरांगे पाटील यांनी टीका केली आहे.राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी आज जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे उपोषणास बसलेल्या मराठा समाजाचे आंदोलन कर्ते मनोज जरांगे पाटील यांच्याशी,दूरध्वनीवरून बातचीत केली असून,अंतरवाली सराटी येथे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी आज उपोषण स्थळी जाऊन मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली. सध्यातरी महाराष्ट्र राज्यात ठीक ठिकाणी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलने केली जात असून,काही ठिकाणी रस्ता रोको सुद्धा केला जात आहे.राजुर,राणी उंचेगाव,हसनाबाद रस्त्यावर,काही ठिकाणी रस्त्यावर टायर जाळून चक्काजाम आंदोलन करण्यात आले आहे.धनसावंगी येथे तर पंचायत समितीचे कार्यालय पेटवून देण्यात आले असून,पंचायत समिती कार्यालयाची महत्वाची कागदपत्रे जळाली असल्याचे वृत्त आहे.आमदार सीमा हिरे यांच्या संपर्क कार्यालयाला सुद्धा कुलूप ठोकण्यात आंदोलन कर्ते यशस्वी झाले असून राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या आहेत.नागपूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर बुलढाणा जिल्ह्यात देऊळगाव येथे,रस्ता रोको करण्यात आले असून,बीड जिल्ह्यात सुद्धा संचारबंदी लागू करण्यात आली आहे.उस्मानाबाद जिल्ह्यात विविध ठिकाणी रस्ता रोको व उपोषणाचा मार्ग मराठा समाजाने स्वीकारला असून,जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांनी संचारबंदीचे आदेश लागू केले गेले आहे.तुळजापूर,नांदेड येथे देखील काही ठिकाणी रस्ता रोको आंदोलन करण्यात आल्याचे वृत्त आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर चे आमदार रमेश बोरनारे यांनी मराठा समाजाच्या आरक्षण मागणीसाठी,आमदारकी पदाचा राजीनामा दिल्या असल्याचे वृत्त आहे.एकंदरीतच राज्यातील सध्याचे मराठा समाजाच्या आंदोलनाने एक वेगळेच वळण घेतले असून,ठीक ठिकाणी आंदोलने,रस्ता रोको चालू असल्याचे वृत्त आहे.