जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
वृत्त-सोशल मीडिया
(अनिल जोशी)
इस्राईल व हमास युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका,फ्रान्स, जर्मनी,ब्रिटन आणि इटलीने जाहीर पाठिंबा व्यक्त करून,एक संयुक्त निवेदन जारी केले आहे.दरम्यान इस्राईलवर झालेल्या हल्ल्याचा तसेच हमास या दहशतवादी संघटनेचा तीव्र निषेध, या निवेदनात करण्यात आलेला असून,अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन,जर्मनीचे चान्सलर ओलाफ शोल्झ,इटलीचे पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी,ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक,फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रान या सर्वांनी जारी केलेल्या निवेदनात, आम्ही सर्व इस्राईलवर केलेल्या दहशतवादी कारवाईचे तीव्र शब्दात निषेध करून,याचे कोणत्याही प्रकारे समर्थन होऊ शकत नसल्याचे म्हटले आहे.
हमास या दहशतवादी संघटनेने,इस्राईल मध्ये अनेक कुटुंबांची हत्या केली असून,जवळपास 200 तरुणांची संगीत महोत्सवात हत्या केली असल्याचे वृत्त आहे.ज्येष्ठ महिला व मुलांचे अपहरण करून,त्यांना क्रूरतेने वागणूक देऊन,अज्ञात स्थळी ओलीस ठेवले आहे.आम्ही सर्व देश मिळून (म्हणजे अमेरिका फ्रान्स जर्मनी इटली ब्रिटन) इस्राईलच्या संरक्षणासाठी व नागरिकांसाठी योग्य त्या प्रयत्नांना साथ देऊ असे म्हटले आहे.
इस्राईल कडून मोठ्या प्रमाणात गाझापट्टीच्या क्षेत्रावर हवाई हल्ले सुरू असून,इस्राईल चे संरक्षण मंत्री योआव्ह गॅलंट यांनी गाझा क्षेत्राला वेढा देण्याचे आदेश दिले आहेत.सद्य परिस्थितीत गाझा क्षेत्रपट्टीवरील वीज व इंधन पुरवठ्यावर बंदी घालण्यात आली असून,बरेच जण मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. इस्राईल मध्ये सुद्धा 900 लोकांचा मृत्यू झाला असून,2200 पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत.इस्राईलच्या हवाई हल्ल्यात आज,गाझा क्षेत्राची बरीच हानी झाल्याचे वृत्त आहे. दरम्यान जर्मनीने व ऑस्ट्रेलियाने पॅलेस्टाईनला देण्यात येणारी मदत स्थगित केल्याचे जाहीर केले असून,ब्रिटनचे व नेपाळचे काही नागरिक इस्रायल मध्ये मृत्युमुखी पडल्याचे वृत्त आहे.