जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
तुळजापूर- महाराष्ट्राची कुलस्वामिनी असणाऱ्या आई तुळजाभवानीची,तुळजापुरात शारदीय नवरात्र उत्सवाची तयारी पूर्ण झाली असून,सध्या देवीची मंचकी निद्रा सुरू असून,रविवारी दि.15 ऑक्टोबर 2023 रोजी घटस्थापना होणार आहे.तुळजापुरात येणाऱ्या देवीभक्त भाविकांसाठी 5 एकरात वॉटरप्रूफ मंडप तयार करण्यात आला आहे. तुळजापुरात येणाऱ्या देवीभक्त भाविकांसाठी पावसापासून व उन्हापासून संरक्षण होण्यासाठी,सदरहू वॉटरप्रूफ मंडप तयार करण्यात आला असून,सदरहू दर्शन मंडप घाटशीळ वाहन तळावर उभारण्यात आला आहे.तुळजापुरात येणाऱ्या देवीभक्त भाविकांसाठी,मंदिर प्रशासनाच्या वतीने सोयी- सुविधांची जय्यत तयारी करण्यात आली असून,मंदिर परिसराची रंगरंगोटी,विद्युत आकर्षक रोषणाई,स्वच्छता आदी गोष्टी पूर्ण झाल्या आहेत.जिल्हा प्रशासनाच्या वतीने कायदा व सुव्यवस्था स्थिती राखण्याच्या दृष्टीने चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
कोल्हापूर- कोल्हापुरात करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात, नवरात्र उत्सवाची तयारी पूर्ण झाली असून,पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने,भक्त भाविकांच्यासाठी सोयी- सुविधा उपलब्ध करून देण्याची तयारी पूर्ण झाली आहे. महाराष्ट्रातील करवीर निवासिनी आई अंबाबाई हे एक प्रसिद्ध क्षेत्र असून,येथील देवीच्या नवरात्रोत्सवात महाराष्ट्रातून नव्हे देशाच्या कानाकोपऱ्यातून,दरवर्षी असंख्य देवीभक्त दर्शनास येत असतात.शुक्रवारी कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार व पोलीस अधीक्षक महिंद्र पंडित यांनी मंदिर परिसराची पाहणी करून,जिल्हा प्रशासनाच्या वतीने 10 दिवस चालणाऱ्या धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाच्या आयोजनाची रूपरेषा स्पष्ट केली.कोल्हापुरात नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिराची रंगरंगोटी,विद्युत रोषणाई, स्वच्छता पूर्ण झाली असून, मंदिर परिसरात ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावून,नियंत्रण कक्ष उभारण्यात आले आहेत.कोल्हापुरातील महालक्ष्मी अन्नछत्राच्या वतीने,रोज येणाऱ्या देवीभक्त भाविकांसाठी, महाप्रसादाची सोय करण्यात आली आहे.यंदाच्या वर्षी नवरात्र उत्सवात,देवीच्या सेवेसाठी अनेक धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.जिल्हा प्रशासनाच्या वतीने कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
घटस्थापनेचे ठराविक मुहूर्त.
🏵️सकाळी.
१)०८:००ते ०९:३०चल २)०९:३०ते११:००लाभ
३)११:००ते१२:३०अमृत
🏵️ दुपारी.
४) २:००ते ३:३०शुभ
पुढे सायंकाळी.
०६:१५ते :०९:१५ शुभ व अमृत.