जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
आज छत्रपती संभाजीनगर येथे,"दाभोळकर- पानसरे हत्या : तपासातील रहस्य?"या पुस्तकाचे प्रकाशन,केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांच्या हस्ते झाले.‘दाभोलकर-पानसरे हत्या : तपासातील रहस्ये ?’ हे पुस्तक लेखक डॉ.अमित थढानी यांनी 10 हजार पानाच्या चार्जशीटचा अभ्यास करून तयार केले आहे.या सर्व प्रकरणात न्यायालयात योग्य तो न्याय होईलच याची निश्चिती वाटते.या पुस्तकाच्या माध्यमातून सगळ्या विषयाला त्यांनी वाचा फोडली आहे,असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे नेते तथा भारताचे केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांनी केले.ते छत्रपती संभाजीनगर येथील ‘यशवंतराव चव्हाण नाट्यगृह’ येथे झालेल्या डॉ.अमित थढानी यांच्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात बोलत होते.
या पूर्वी डॉ.थढानी यांनी लिहिलेल्या ‘रॅशनालिस्ट मर्डर्स’ या इंग्रजी भाषेतील पुस्तकाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्यानंतर त्यांनी डॉ.नरेंद्र दाभोलकर आणि कॉ.गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या तपासावर मराठी भाषेतील हे स्वतंत्र पुस्तक लिहिले आहे. या वेळी केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. कराड, पुस्तकाचे लेखक तथा मुंबईतील प्रसिद्ध सर्जन डॉ. अमित थढानी, ‘हिंदु विधीज्ञ परिषदे’चे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर आणि ‘संकल्प हिंदुराष्ट्र अभियाना’चे कार्यवाह श्री. कमलेश कटारिया यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमाला निवृत्त जिल्हा न्यायाधीश शशिकांत कुलकर्णी आणि हिंदु विधीज्ञ परिषदेचे संस्थापक सदस्य अधिवक्ता सुरेश कुलकर्णी यांची उपस्थिती होती.
या प्रसंगी पुस्तकाचे लेखक डॉ.थढानी म्हणाले की, दाभोलकरांच्या हत्येत वापरलेले पिस्तुल हे नंतर ‘सीबीआय’च्या कस्टडीमध्ये आले होते.असे असतांना त्यांच्या कस्टडीतून ते बाहेर निघून कॉ.पानसरे हत्येमध्ये ते कसे काय वापरले जाते आणि पुन्हा कस्टडीत येऊन बसते ? हे सर्व षड्यंत्र आहे.खर्या आरोपींना कोणी शोधलेलेच नाही.केवळ एका हिंदुत्ववादी संघटनेला गोवण्याचे काम केले आहे.
या वेळी अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर म्हणाले की,पानसरे-दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपी सचिन अंदुरे हा दुकानात अकाऊंटंट म्हणून काम करतो.१६ फेब्रुवारी २०१५ ला पानसरे यांची सकाळी हत्या झाली.त्या वेळी सचिन अंदुरे सकाळी कोल्हापुरात होता;पण तो ज्या दुकानात काम करतो, तेथील रजिस्टरमध्ये तो अर्धा दिवस दुकानात नव्हता,अशी नोंद आहे.याचा अर्थ सचिन अंदुरे संभाजीनगरवरून कोल्हापूरला गेला.तेथे त्याने पानसरेंचा खून केला आणि पुन्हा तो दुपारपर्यंत संभाजीनगरला परत आला.हे कसे शक्य आहे? प्रत्यक्षात जायला-यायला किती वेळ लागेल?या सर्वांची उत्तरे पोलिसांना द्यायची नाहीत.हे पुस्तक म्हणजे एका सर्जनने केलेला ‘सर्जिकल स्ट्राईक’आहे.या वेळी ‘संकल्प हिंदुराष्ट्र अभियाना’चे कार्यवाह श्री.कमलेश कटारिया म्हणाले की,आज देशातील विविध न्यायालयांत पाच कोटी खटले प्रलंबित आहेत.अनेक खटल्यांतील हिंदुत्ववादी न्यायाची वाट बघत आहे;मात्र दुर्दैवाने आज सेक्युलॅरिझमच्या नावाखाली हिंदुत्ववाद्यांना छळले जात आहे.