जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
महाराष्ट्र शासनाच्या वस्त्रोद्योग सहकार पणन विभागाने, हातमाग उद्योजकांना आर्थिक दिलासा म्हणून,त्याबरोबरच वस्त्रोद्योगाला चालना देण्यासाठी,200 युनिट पर्यंतचे वीज मोफत देण्याचा निर्णय जाहीर केला असून,त्यापेक्षा अधिक वीज वापर करणाऱ्या लाभार्थ्यांना उर्वरित वीज वापराची देय रक्कम भरावी लागणार आहे.लाभार्थी उद्योजक हा,हातमाग विणकर व अधिकृत नोंदणीदार असावा.त्याबरोबरच हातमाग विणकर म्हणून गेले सहा महिने काम करत असलेला लाभार्थी असावा.
राज्यातील वस्त्रोद्योगाला व हातमाग उद्योजकांना चालना देण्यासाठी शासनाने घेतलेला निर्णय हा स्तुत्य असून,लाभार्थी हातमाग विणकाराकडे स्वतःचे अधिकृत वीज कनेक्शन असणे अनिवार्य आहे.तसेच योजनेतले लाभार्थी ठरवण्यासाठी वस्त्रोद्योग आयुक्त अध्यक्षांना पूर्ण अधिकार असून,महाराष्ट्र राज्यातील जास्तीत जास्त हातमाग विणकरांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन राज्य शासनाने केले आहे.
महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या निर्णयाचे राज्यातील हातमाग उद्योजकांनी स्वागत केले असून,वस्त्रोद्योगाला चालना देण्यासाठी व हातभार लावण्यासाठी शासनाने उचललेले पाऊल अतिशय स्वागतार्ह आहे.महाराष्ट्र राज्यातील हातमाग उद्योजक व हातमाग विणकारांमध्ये,शासनाच्या निर्णयामुळे आनंदाचे वातावरण पसरले आहे.