जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)
वृत्त-सोशल मीडिया
गेले 17 दिवस बोगद्यात अडकलेल्या 41 कष्टकरी कामगारांचे श्वास,आज अखेर मुक्त झाले असून,अडकलेल्या 41 कष्टकरी कामगारांना पुनर्जीवन मिळाले आहे.देशभरातील सर्व नागरिकांच्या कडून झालेली प्रार्थना,अखेर यश प्राप्तीस पोचली आहे.राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या जवानांनी रात्रीच्या वेळी 2.5 फूट रुंदीच्या पाईपच्या मदतीने,सर्व 41 कामगारांना सुरक्षितरित्या बाहेर काढले.गेले 17 दिवस अडकलेल्या 41 कष्टकरी कामगारांना बाहेर काढण्यासाठी व बचाव मोहिमेच्या अखेरच्या टप्प्यावर देखरेख ठेवण्यासाठी, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी व केंद्रीय मंत्री व्ही.के. सिंह उपस्थित होते.
दरम्यान 17 दिवसापूर्वी उत्तरकाशी मधील सिल्क्यारा येथे बांधल्या जात असलेल्या बोगद्यामध्ये,ढिगारा कोसळल्याने, 41 मजूर अडकून पडले होते.शेवटपर्यंत सर्व अत्याधुनिक प्रकारची यंत्रे,सामुग्री राबवून देखील,मोहिमेची वाटचाल अयशस्वीतीकडे सुरू होती,पण अखेर 15 मीटर पर्यंत हाताने खोदकाम करून सर्वच्या सर्व 41 कष्टकरी कामगारांना बाहेर काढण्यास,एनडीआरएफच्या जवानांना यश आले.
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी सर्वच्या सर्व 41 कामगारांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना राज्यशासनाकडून 1 लाख रुपयांची मदत देऊन,घरी सोडले आहे.सदर यशस्वी मोहीम राबवून 41 कामगारांची सुखरूप सुटका झाल्याबद्दल,केंद्रीय रस्ते,वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी,केंद्रीय गृहमंत्री अमित शहा,यांनी समाधान व्यक्त केले आहे.