जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
सांगलीतील आयुर्विन पुलाला काल 94 वर्षे पूर्ण झाली असून, अजूनही हा पूल मजबूत अवस्थेत उभा असून,त्याची बांधणी सुद्धा कलाकुसरीने अप्रतिम आहे.सांगलीतील आयुर्विन पूल हा श्रीमंत राजे चिंतामणराव पटवर्धन यांच्या कारकिर्दीत बांधला असून,पुलाचे आर्किटेक्ट श्रीयुत व्ही.जी.भावे होते. श्रीयुत व्ही.आर.रानडे हे या पुलाचे ठेकेदार होते,शिवाय मुख्य सल्लागार व इंजिनियर म्हणून व्ही एन वर्तक यांनी काम पाहिले होते.आज या आयुर्विन पुलाचे बांधकाम 94 वर्षांपूर्वीचे असून सुद्धा,हा पूल इतका मजबूत असून,राज्यातील एक नावाजलेल्या पुलांपैकी हा एक पूल आहे.
राज्यातील बांधकाम क्षेत्रातील तज्ञाना हा एक मोठा लक्षणीय बोध असून,हल्लीची बांधकामे बघितली तर,2 वर्षे देखील केलेले रस्ते नीट राहत नाहीत.काही ठिकाणी तर पुल उद्घाटन झाल्यावर काही ठराविक वर्षात पडल्याची उदाहरणे सुद्धा नजरेसमोर आहेत.आज सांगलीतील आयुर्विन पूल 90 वर्षे पूर्ण होऊन 100 कडे प्रयाण करत असलेल्या या पुलाकडे पाहिले तर,तत्कालीन आर्किटेक्ट,ठेकेदार व कारागिरांचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे.राज्यात आदर्शत्मक काम करणाऱ्या आर्किटेक्ट,ठेकेदार व कारागिरांना हा एक आदर्शाचा वारसा ठेवा होय.