जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
मुंबई झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत,मराठा समाजास, कायदेशीर बाबी पूर्ण करून टिकणारे आरक्षण देण्यात एकमत झाले असून,यासाठी महाराष्ट्र राज्यातील सर्व पक्ष एकत्र येण्यासाठी तयार झाले आहेत,असे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.मुंबईत काल सह्याद्री अतिथी गृहात झालेल्या सर्वपक्षीय बैठकीनंतर पत्रकार परिषदेत,महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी ही माहिती दिली.
महाराष्ट्र राज्यातील मराठा समाजास कायदेशीर बाबींची पूर्तता करून,टिकणारे आरक्षण देण्यासाठी,वेळ देणे अत्यंत गरजेचे असल्याचे,राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी विशद करून,मराठा समाजाने यासाठी संयम ठेवणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन ही त्यांनी केले.महाराष्ट्र राज्यातील गेल्या काही दिवसातील घडलेल्या घटना अयोग्य असून,त्यामुळे आंदोलनाची बदनामी होत आहे.महाराष्ट्र राज्यात कायदा, सुव्यवस्था व शांतता राखण्याच्या दृष्टीने,राज्यात कुणीही कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नये असे आवाहन ही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी केले आहे.जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे उपोषणास बसलेले उपोषणकर्ते मनोज जरांगे- पाटील यांनी उपोषण मागे घ्यावे असे आवाहनही,राज्याचे मुख्यमंत्री यांनी केले असून,आज झालेल्या मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात सर्वपक्षीय बैठकीस, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे,राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री शरद पवार,अशोकरावजी चव्हाण,विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार,अंबादास दानवे यांच्यासह सर्व वरिष्ठ सर्वपक्षीय मान्यवर नेते व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.