जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
कोल्हापुरातील ऊस आंदोलन दराची कोंडी अखेर फुटली असून,मागच्या हंगामातील तुटलेल्या ऊसाला,ज्या कारखानदारांनी प्रति टन 3000 रुपयांपेक्षा कमी भाव दिला आहे,त्यांनी प्रतिटन 100 रुपये ज्यादा दर द्यावेत व ज्यांनी प्रति टन 3000 रुपये दिले आहेत,त्यांनी आणखी किमान प्रति टनास ज्यादा 50 रुपये द्यावेत असा तोडगा निघून,अखेर कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांनी यास संमती देऊन,ऊस दर आंदोलनावर पडदा पडल्याचे स्पष्ट झाले आहे.
काल पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर शेतकरी स्वाभिमानी संघटनेच्या वतीने काही काळासाठी चक्काजाम आंदोलन केले होते.कोल्हापुरात आज अखेर ऊस दर आंदोलनाला यश येऊन,ऊस दराबाबतीतील आंदोलन स्थगित झाले आहे.स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांनी आता आपला मोर्चा सांगलीकडे वळवणार असल्याची घोषणा केली असून,त्यामुळे आता सांगलीत ऊस दर आंदोलन सुरू होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व कारखान्यांनी ठरलेल्या दरानुसार,जादा भाव देण्यासंबंधी पत्र,जोपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे व आमच्याकडे पोहोचत नाही,तोपर्यंत कोणत्याही कारखान्यांनी कारखाने सुरू करू नयेत असे ठरले आहे.दरम्यान शनिवारी सांगली जिल्ह्यातील राजारामबापू कारखान्यावर सर्वांनी एकत्र येण्याचे ठरले असून,शेतकऱ्यांच्या एकत्रित येण्याच्या गोष्टीमुळे,कारखानदारांच्या मध्ये असलेली एकजूट फोडली असल्याचे सिद्ध झाल्याचे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांनी म्हटले आहे.