जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
सांगलीत आज कृष्णाकाठी आयोजित ,‘क्लीन सांगली, हेल्दी सांगली... यासाठी काय हवं, यावर तुमचं मत हवं’, असं आवाहन काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी केलं होतं. त्याला उत्तर देताना सांगलीकर तज्ज्ञ आणि जाणकारांनी आज ‘सांगलीकरांना शुद्ध पाणी हवं आणि ते थेट चांदोली धरणातूनच आणावं लागेल’, अशी आग्रही भूमिका मांडली.
येथील कृष्णाकाठी आयोजित बैठकीत कृष्णा नदीचं प्रदुषण रोखण्यासाठी एकजूट,रखडलेली ड्रेनेज योजना वेळेत पूर्ण होण्यासाठी दबावगट निर्माण करणे,वारणा उद्भव योजना, कचरा वर्गीकरणाचा प्रश्न यांसह स्वच्छता आणि पाणी पुरवठ्याच्या विविध मुद्यांवर सविस्तर मुद्दे मांडण्यात आले.
पृथ्वीराज पाटील म्हणाले, ‘‘कृष्णा नदी कोरडी पडल्यानंतर मी पात्रात उतरून स्वच्छता केली. नदीची अवस्था पाहून आरोग्यदायी सांगलीसाठी व्यापक मोहिम राबवण्याचा निर्धार केला. शहरात स्वच्छता, दुषित पाण्यासोबत हवेच्या प्रदुषणाचा प्रश्न गंभीर बनतो आहे. त्यावर निश्चित कार्यक्रम आखू, एकजुटीने काम करू.’’
डॉ.मनोज पाटील यांनी प्लॅस्टिक कचऱ्याच्या स्वतंत्र संकलनाची संकल्पना मांडली.माजी महापौर सुरेश पाटील यांनी वृक्षारोपण वाढवणे,झाडे जगवणे गरजेचे आहे.वारणा उद्भवऐवजी थेट चांदोली धरणातून पाणी आणणे आता संयुक्तिक ठरेल.मोहल्ला क्लीनिकसारखी संकल्पना आरोग्य व्यवस्था सुधारू शकेल,अशी सूचना त्यांनी केली.डॉ.रवींद्र व्होरा यांनी नदीकाठच्या शेतीतील रासायनिक खतांचा बेसुमार वापर हे पाणी प्रदुषणाचे मूळ असल्यावर बोट ठेवले.वि.द.बर्वे यांनी सगळे प्रश्न महापालिकेच्या खुंटीवर अडवण्याऐवजी सांगलीकरांनी स्वच्छतेसाठी पुढे आले पाहिजे,असे मत मांडले. थेट चांदोलीतून पाण्यासाठी पृथ्वीराज पाटील यांनी पुढाकार घ्यावा,असे आवाहन केले.अविनाश जाधव यांनी कृष्णा नदीची अवस्था मुळा-मुठा नदीपेक्षा भयानक होईल,अशी भिती व्यक्त करत निर्माल्याबाबत जागृतीसाठी भटजींनी पुढे यावे,असे आवाहन केले.डॉ.सुहास खांबे यांनी विविध मार्गांनी नदीत मिसळणाऱ्या रसायनांचे गणित मांडत ते थांबवण्याची सूचना केली.
सतीश साखळकर यांनी कृष्णा व वारणा नदीचे प्रदूषण समान पातळीवर असून शुद्ध पाण्यासाठी आता चांदोली धरण हाच पर्याय उरल्याचे स्पष्ट केले.ई-टॉईलेट,घरोघरी कचरा डबे, शहराचे भाग बनवून त्यानुसार स्वतंत्र नियोजनाची संकल्पना मांडली.हणमंत पवार यांनी भुयारी गटारीचा दुसरा टप्पा मेअखेर पूर्ण व्हावा,यासाठी उपोषणाला बसू,अशी सूचना केली.शेखर दांडेकर यांनी पाणीपुरवठ्या यंत्रणा कालबाह्य असल्याचा मुद्दा मांडताना फक्त पिण्यासाठी स्वतंत्र पाईपलाईची गरज विषद केली.विजयकुमार दिवाण यांनी चांदोलीतून पाण्याबाबत आग्रही भूमिका मांडली.एस.के. रांजणे,संजय चव्हाण,सर्जेराव पाटील,डॉ.दिलीप पटवर्धन, एम.एस.रजपूत,प्रशांत पाटील मजलेकर,रावसाहेब पाटील, अभिजित भोसले,राकेश दड्डणावर,प्रभाकर केंगार,डॉ.रवींद्र ताटे,डॉ.सुनिल पाटील आदींनी चर्चेत सहभाग घेत महत्वाचे मुद्दे मांडले.आशिष कोरी यांनी सूत्रसंचालन केले.
सगळ्या साथी पाण्यामुळे--
डॉ.राजेंद्र भागवत म्हणाले,‘‘शुद्ध पाणी व आरोग्याचं नातं आहे.या शहरात टायफाईड,कॉलरा,कावील,लेप्टोपायरोसिस, मूत्रमार्गातील संक्रमण अशा साथींसह पोटाचे विकार वाढण्यामागे अशुद्ध पाणी हे कारण आहे.दुषित पाण्यातून येणारे काही विकार थेट मंदूपर्यंत जातात.’’
पुढचे पाऊल एकसाथ - पृथ्वीराज पाटील.
या मंथनातून समोर आलेल्या मौलिक सूचनांच्या आधारे एक व्यापक आणि राजकारण विहरीत ‘क्लीन सांगली,हेल्थी सांगली’ मोहिम हाती घेवू. शुद्ध पाणी हा अजेंड्यावरील विषय असेल.त्याचा विस्तृत कार्यक्रम घेवून लवकरच पुढचे पाऊल एकसाथ उचलू,अशी ग्वाही पृथ्वीराज पाटील यांनी दिली.