जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
महाराष्ट्र राज्यात गेले काही दिवसात झालेल्या गारपीट व अवकाळी पावसामुळे,शेतीचे व फळ पिकांचे मोठे नुकसान झाले असून,या नुकसान झालेल्या शेतीचे व फळ पिकांचे पंचनाम्याचे प्रस्ताव त्वरित तयार करून,सादर करण्याचे आदेश,राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी दिले आहेत.
महाराष्ट्र राज्यात,राज्य शासनाच्या कृषी विभागाकडून प्राप्त झालेल्या प्राथमिक माहितीनुसार,शेती व फळबागांचे क्षेत्र जवळपास 99 हजार 381 बाधित झाले असून,त्या पिकांचे व फळबागांचे नुकसानीचे पंचनामे त्वरित करून,त्याचे प्रस्ताव शासनास त्वरित देण्यात यावेत असे निर्देश,राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांनी क्षेत्रीय यंत्रणेला आदेश देऊन,नुकसानग्रस्त शेती पिकांचे व फळबागांचे पंचनामे त्वरित करून,त्यांचे प्रस्ताव शासनास सादर करावे असे आदेश देण्यात आले आहेत.
दरम्यान येणाऱ्या अधिवेशनाची वाट न पाहता,राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित तातडीने मदत देण्यात यावी अशी मागणी,विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.त्याबरोबरच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून,राज्यातील झालेल्या अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित मदत देण्याची मागणी केली असून,कोरडवाहू शेतीसाठी प्रति एकरी 25,000/- रुपये व बागायतीसाठी प्रति एकरी 50,000/- रुपये देण्यात यावेत अशी मागणी केली आहे.सद्यस्थितीत राज्यातील शेती पिकांचे नुकसान झालेल्या व फळबागांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना,राज्य शासनाने त्वरित योग्य ती मदत द्यावी अशी मागणी सर्वच बाजूने जोर धरत आहे.