- तपासलेल्या अभिलेख्यांचा अहवाल दररोज सादर करा.
जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अजित निंबाळकर)
कोल्हापूर, दि. 6: कुणबी नोंदी शोधण्यासाठी युद्धपातळीवर काम करा.तसेच तपासलेल्या अभिलेख्यांचा अहवाल दररोज सादर करा,असे निर्देश आज जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी संबंधित विभागांचे अधिकारी, प्रांताधिकारी व तहसीलदार यांना दिले.
मराठवाड्यात कुणबी नोंदी शोधण्यासाठी राबविण्यात आलेली मोहीम संपूर्ण राज्यभर मिशन मोडवर राबविण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतेच विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते.या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे.याबाबत करावयाच्या कामांच्या नियोजनाबाबत जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली.यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली,सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने,जिल्हा अधीक्षक भुमी अभिलेख सुदाम जाधव,कोल्हापूर महानगरपलिकेच्या उपायुक्त साधना पाटील,समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त सचिन साळे,नगरपालिका प्रशासन विभागाचे सहआयुक्त नागेंद्र मुतकेकर तसेच महसूल,पोलीस जिल्हा परिषद,शिक्षण,जात पडताळणी,कारागृह,सैनिक कल्याण यांच्यासह अन्य विभागांचे जिल्हास्तरीय अधिकारी उपस्थित होते.तर सर्व प्रांताधिकारी,तहसीलदार दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी झाले.
जिल्हाधिकारी राहुल रेखावर म्हणाले,मराठवाड्यात तपासण्यात आलेल्या नोंदीच्या धर्तीवर कुणबी नोंदी तपासण्यासाठी मिशन मोडवर मोहीम राबवा.त्यासाठी सर्व विभागांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करुन कार्यवाही गतिमान करा.त्याचबरोबर सर्व विभागांच्या अधिकाऱ्यानी समन्वयाने हे काम युद्धपातळीवर पूर्ण करावे.
कुणबी नोंदीच्या अभिलेखांचे तसेच मोडी उर्दू लिपीतील अभिलेखांचेही भाषांतर करुन डिजिटायजेशन करुन संवर्धन करा.यासाठी पुराभिलेखागार कार्यालय व शिवाजी विद्यापीठाचा भाषा विभागाच्या माध्यमातून अधिकृत मोडी लिपी भाषिक,वाचक यांची मदत घ्या,अशी सुचनाही त्यांनी यावेळी केली.कुणबी नोंदी तपासणी करताना कोणकोणते अभिलेख तपासावे तसेच याबाबतची कार्यपद्धती कशा पद्धतीने राबवावी याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी तेली यांनी यावेळी दिली.
जिल्ह्यातील कुणबी,मराठा कुणबी व कुणबी मराठा या नोंदी तपासण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात "विशेष कक्ष" स्थापन करण्यात आला आहे. तसेच उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय समित्यांची स्थापना करण्यात आल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली.निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली हे या कक्षाचे समन्वय अधिकारी असणार आहेत.