आरोग्य भाग- 12
जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)
अस्थमा किंवा दमा हा त्रास बऱ्याच लोकांना असतो.विशेषतः थंडीमध्ये आणि पावसाळ्यामध्ये आभाळ भरून आल्यावर दम्याचे अटॅक येतात.दमा सहजासहजी बरा होऊ शकत नाही.परंतु दमा नियंत्रित करता येतो.धूर,धूळ,हवा प्रदूषण इत्यादीची अॅलर्जी,सतत सर्दी,खोकला,मानसिक तणाव,जागरण,अतिश्रम,रक्ताची कमतरता, आनुवंशिकता ही दमा होण्याची मुख्य कारणे आहेत.
दमा/अस्थमाच्या पेशंटनी पुढील काळजी घ्यावी...
*१. दम्याचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी कफ वाढवणारा आहार दही,दूध,ताक,साबुदाणा,केळी हे पदार्थ खाऊ नयेत.
*२. थंड पदार्थ खाणे टाळावे.खूप तहान लागली तरी थंड पाणी,पेय याचा मोह टाळावा.
*३. धूम्रपान करू नये.हे व्यसन असेल तर दम्याचा धोका वाढतो.
*४. एसी किंवा कूलरमध्ये झोपू नये.रात्री जागरण करणे,थंड हवेत फिरणे टाळावे.
*५. पोट नेहमी साफ राहील असे पहावे. मैदा,त्याचे पदार्थ, बटाटे,शिळे अन्न,हॉटेलचे जेवण टाळावे.
*दमा/अस्थमासाठी काही घरगुती उपाय...*
*१. थंडीमध्ये सुंठ व मध किंवा आल्याचा रस व मध एकत्र करून चाटण करावे.
*२. दम्याचा जोरात अॅटॅक आल्यास खडीसाखर,खिसमिस आणि दालचिनी चावून खावे.अॅटॅक कमी होतो.
*३. छातीला तीळाचे तेल लावून शेक घ्यावा.यामुळे छातीतील कफ नाहीसा होतो. ही गोष्ट रात्री झोपण्यापूर्वी किंवा सकाळी आंघोळ करण्यापूर्वी करणे चांगले.
*४. रात्री झोपण्यापूर्वी किंवा सकाळी पुढील काढा घ्यावा.दोन ते तीन कप पाणी घेऊन त्यात तुळस व अडुळशाची दोन पाने घाला.पाणी उकळू द्यावे.हा काढा घेतल्यास दमा कमी होतो.
*५. छातीतील व गळ्यातील कफ सुटण्यासाठी दालचिनी दुधात उकळून घ्यावी.त्यात थोडा मध टाकून प्यावे.
*६.एक ग्लास गरम पाण्यात एक चमचा मीठ टाकून ते पाणी दिवसभर एक एक घोट प्यावे.पिल्यास कफ पातळ होऊन बाहेर पडतो.हृदयरोग असल्यास हा उपाय करू नये.
*७. मोहरीच्या तेलात मीठ टाकून छातीला चोळावे.गरम पाण्याने शेकावे. कफ पातळ होऊन सुटतो.
*८. आहारात दुधी भोपळा,लसूण,पडवळ,,चवळी इ.भाज्यांचा समावेश करावा. कोबी गरम पाण्यात टाकून त्याची वाफ घ्यावी.
*९. प्राणायाम तसेच इतर व्यायाम प्रकृती प्रमाणे करावे.सकाळी व संध्याकाळी मोकळ्या हवेत फिरावे. दीर्घश्वसन करण्याची सवय लावून घ्यावी.
सदरूहू माहितीचे लेखांकन डॉक्टर सुनील बेंगलोर यांनी केले असून,आरोग्य आणि समर्थ सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून संपादन करून,जनहितार्थ प्रसिद्ध करण्यात येत आहे.