आरोग्य भाग -13
जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
लहान मुलांना वयाच्या ५ ते ७ वर्षापर्यंत सतत सर्दी,कफ, खोकला,ताप असे काही ना काही होतच असते.धुळीची अलर्जी,विविध विषाणूजन्य समस्या,बदलते हवामान अशा कारणांनी मुलांना या समस्या उद्भवतात.काही वेळा हा कफ ठराविक काळाने बरा होतो.मात्र काही वेळा औषधोपचार आणि घरगुती उपाय करुनही हा घट्ट कफ छातीत तसाच राहतो.अशावेळी वाफारा,शेक देणे,गरम पाणी पिणे असे उपाय केल्यावर हळूहळू बरेच दिवसांनी यावर थोड्या प्रमाणात आराम मिळतो.पण या सगळ्या काळात मुलांची अजिबातच झोप होत नाही.कफ,सर्दी किंवा खोकला यामुळे त्यांना सतत जाग येत राहते आणि मग सलग झोप मिळत नाही. त्यांच्याबरोबरच आपल्याही झोपेचे खोबरे होते ते वेगळे.
दुसरीकडे कफामुळे अन्न जात नाही त्यामुळे अंगात ताकद राहत नाही.त्यात खेळणे सतत सुरू असल्याने थकवा येतो. असे सगळे झाले की मुलांच्या एकूणच आरोग्यावर त्याचा विपरीत परीणाम होतो.या सगळ्यातून बाहेर यायला आणि पुन्हा नेहमीचे रुटीन सुरू व्हायला बराच वेळ लागतो. अशावेळी औषधांबरोबरच घरच्या घरी एक सोपा पारंपरिक उपाय केला तर त्याचा निश्चितच चांगला फायदा होतो. आयुर्वेदतज्ज्ञ डॉ.मिहीर खत्री हा उपाय कोणता आणि तो कसा करायचा याविषयी माहिती देतात.
उपाय काय...?
खायचे पान म्हणजेच विड्याचे पान यावर अतिशय असरदार ठरते.या विड्याच्या पानाचा वेल आपण घरातही लावू शकतो किंवा पानाच्या दुकानात तर ही पानं अगदी सहज मिळतात. मुलांच्या छातीला हलके मोहरीचे तेल लावायचे.विड्याची १ किंवा २ पानं तव्यावर थोडी गरम करायची आणि मुलांच्या छातीवर ही पानं ठेवून द्यायची. सकाळी उठल्यावर मुलांचा कफ पूर्णपणे निघून गेलेला आढळेल. तसेच यामुळे मुलांना रात्रभर गाढ झोप येण्यासही याची चांगली मदत होईल. २ वर्षाच्या आतल्या बाळांसाठी हा प्रयोग फायदेशीर ठरतो.पण मूल २ वर्षापेक्षा थोडे मोठे असेल तर विड्याचे १ पान कुटायचे त्यात वेलचीचे २ दाणे आणि थोडासा मध घालून ते मुलांना खायला लावायचे.कफ निघून जाण्यासाठी विड्याचे पान अतिशय उपयुक्त औषध असून लहान मुलांनाही त्याचा खूप चांगला फायदा होतो.
या लेखाचे संग्रहक कुमार चोप्रा सुनील इनामदार असून, आरोग्य आणि समर्थ सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून संपादन करून,जनहितार्थ प्रसिद्ध करण्यात येत आहे.