जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
कोल्हापूर जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,कोल्हापूर कार्यालयामार्फत गुरुवार दि.21 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत΄सी बिल्डींग, शासकीय निवासस्थान, विचारे माळ, कावळा नाका, कोल्हापूर येथे “प्लेसमेंट ड्राईव्हचे” आयोजन करण्यात आले आहे. यासाठीचा प्रवेश मोफत असून इच्छुक उमेदवारांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळास भेट देऊन आपले पसंतीक्रम ऑनलाईन नोंदवावेत,असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त संजय माळी यांनी केले आहे.
या प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये औद्योगिक तसेच इतर सेवा क्षेत्रातील पाच खासगी उद्योजकांनी सहभाग दर्शविला असून, त्यांच्याकडून विविध प्रकारची सुमारे 325 पेक्षा जास्त रिक्तपदे या प्लेसमेंट ड्राईव्हकरीता कळविण्यात आली आहेत. या पदांकरीता किमान 10 वी, 12 वी, कोणत्याही शाखेतील पदवीधर, अभियांत्रिकी पदविका, आय.टी.आय. इत्यादी पात्रता असणारे उमेदवार पात्र असणार आहेत.
प्रत्यक्ष मुलाखतीला येताना उमेदवारांनी आपला बायोडाटा, सर्व शैक्षणिक कागदपत्रे,आवश्यकतेनुसार अर्जाच्या व आधारकार्डच्या प्रती सोबत आणणे आवश्यक आहे.या संधीचा लाभ जास्तीत जास्त उमेदवारांनी घ्यावा तसेच अधिक माहितीसाठी उमेदवार आणि उद्योजकांनी 0231-2545677 या दुरध्वनीवर संपर्क साधावा,असेही श्री.माळी यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.