जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
वृत्त-सोशल मीडिया
देशातील मध्यप्रदेश,राजस्थान,छत्तीसगड विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कमळ फुलले असून,तेलंगणामध्ये बी.आर. एस.चा पराभव होऊन,काँग्रेस सत्तेवर आली आहे.
मध्य प्रदेश मध्ये एकूण विधानसभेच्या 230 जागा पैकी, भारतीय जनता पार्टीने 163 जागेवर,काँग्रेस पक्षाने 66 जागेवर आणि इतर पक्षांनी 1 जागेवर विजय प्राप्त केला आहे.मध्य प्रदेश मध्ये परत एकदा दुसऱ्यांदा,भारतीय जनता पार्टीचे सरकार आले आहे.दरम्यान मध्यप्रदेश मध्ये "लाडली बहना"या महिला प्रिय योजनेमुळे,महिला मतदारांनी भारतीय जनता पार्टीला विजयी केल्याचे दिसत आहे.
राजस्थानमध्ये विधानसभेच्या एकूण 200 जागांपैकी भारतीय जनता पार्टी 115 जागेवर,काँग्रेस 69 जागेवर व इतर पक्ष 15 जागेवर उमेदवार विजयी झाले आहेत.राजस्थानमध्ये दर 5 वर्षांनी होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत,सत्ता बदलण्याची परंपरा असून,त्याप्रमाणे सत्ता परिवर्तन झाल्याचे दिसत आहे.शिवाय काँग्रेसमधील अंतर्गत वादाचे विषय कारणीभूत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
तेलंगणामध्ये 119 विधानसभेच्या जागांपैकी काँग्रेस 64 जागेवर, बी.आर.एस. 39 जागांवर, 8 जागांवर भारतीय जनता पार्टीचे, 7 जागांवर एमआयएम आणि 1 जागेवर इतर पक्षांचा विजय झाला आहे.तेलंगणा मधील तत्कालीन मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या विरोधात मतप्रवाह गेला असल्याचे दिसून येत असून,काँग्रेसने दिलेल्या आश्वासनांचा तेथील मतदारांनी विचार केला असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.त्याबरोबरच भारत जोडो यात्रेचा,रेवंथ रेड्डी यांनी केलेल्या जोरदार प्रचाराचा फायदा काँग्रेस पक्षाला तेलंगणामध्ये मिळाला आहे.
छत्तीसगडमध्ये विधानसभेच्या एकूण 90 जागांपैकी 54 जागांवर भारतीय जनता पार्टीचे,35 जागेवर काँग्रेस पक्षाचे व 1 जागेवर इतर पक्षाचे उमेदवार विजयी झाले आहेत.दरम्यान छत्तीसगडचे तत्कालीन मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या कामकाजाबद्दल जनतेमध्ये नाराजी असून," महादेव ॲप" गैरव्यवहार प्रकरण काँग्रेसला पराभूत करण्यात कारणीभूत असल्याचे चित्र दिसत आहे.भारतीय जनता पार्टीला, आदिवासींचा लक्षणीय पाठिंबा मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे.
एकंदरीतच देशातील झालेल्या मध्य प्रदेश,तेलंगणा, छत्तीसगड,राजस्थानच्या विधानसभेच्या निवडणुकीचा परिणाम हा,आगामी येऊ घातलेल्या लोकसभा 2024 च्या निवडणुकीत दिसून येणार असल्याचे स्पष्ट आहे.सुशासन आणि विकासावर जनतेने कौल दिला असून,विकसित भारताच्या लक्ष्यावर आपण वाटचाल करीत आहोत असे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.देशातील विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दिलेला जनतेचा कौल आम्ही स्वीकारत असून विचारधारेवर असणारी लढाई यापुढेही चालू राहील असे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे.