जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
सांगलीतील कृष्णा नदीचे प्रदूषण गंभीर पातळीवर पोहचले आहे.त्याकडे आता कानाडोळा करून चालणार नाही.ही नदी सांगलीची अस्मिता आहे.नदीचे आरोग्य जपण्यासाठी सांगलीकरांना सोबत घेवून एकत्र काम करू.स्वच्छ नदीसाठी एकत्रित व्यापक मोहिम राबवू.त्यात प्रदूषण नियंत्रण मंडळाने सोबत यावे,असे आवाहन काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी आज प्रदूषण नियंत्रण मंडळातील बैठकीत केले.
मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी नवनाथ अवताडे,अधिकारी डॉ.आर.आर.मातकर,डॉ.गजानन खडकीकर यांच्यासोबत पृथ्वीराज पाटील यांनी सविस्तर चर्चा केली. ‘क्लीन सांगली, हेल्दी सांगली’ उपक्रमात तज्ज्ञांकडून आलेल्या सूचनांमध्ये कृष्णा नदीचे प्रदूषण आणि स्वच्छता हा मुख्य मुद्दा होता. त्याबाबत त्यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळ अधिकाऱ्यांशी चर्चा केली.नदी स्वच्छतेबाबत राज्य शासनाकडे आधीच दाखल असलेल्या आराखड्यानुसार काम गरजेचे आहे.आम्ही एक कार्यक्रम हाती घेतोय,त्यात आपण सोबत या,असे आवाहन श्री.पाटील यांनी केले.
नदीकाठची शहरे आणि गावांचे सांडपाणी प्रक्रिया केल्याशिवाय नदीत सोडले जावू नये, यासाठी गावांमध्ये सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारणे.शेरीनाला योजनेसाठी ९० कोटी रुपयांचा प्रस्ताव दाखल आहे.तो लवकर मंजूर करू घेणे.रासायनिक शेतीवर नियंत्रण आणणे.रसायनयुक्त पाणी नदीत सोडण्याबाबत कारखान्यांना रोखणे,या मुद्यांवर लक्ष देण्याची गरज आहे,अशा मुद्यांवर चर्चा झाली. ‘क्लीन सांगली..’ उपक्रमात या सर्व मुद्यांचा समावेश असेल. सांगलीकरांच्या सोबतीने आपण प्रदूषण मुक्तीसाठी लढूया, असे त्यांनी सांगितले.या उपक्रमात आम्ही सक्रिय सहभाग घेवू,लागली ही चांगली मोहिम ठरेल,अशी ग्वाही श्री.औताडे यांनी दिली.
पिण्याच्या पाण्यासाठी...
पृथ्वीराज पाटील यांनी कृष्णा व वारणा नद्यांतील पाणी नमुन्यांच्या तपासणीचा अहवाल अधिकाऱ्यांकडून घेतला. सध्याच्या घडीला पाण्याच्या प्रदूषणाला कोणते घटक अधिक कारणीभूत ठरत आहे,यावर चर्चा झाली.सांगलीकरांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळवून देणे,हा आपला मुख्य उद्देश असेल,असे श्री.पाटील यांनी स्पष्ट केले.