जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
नागपूर मध्ये सध्या सुरू असलेले विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशनाचे कामकाज आज संस्थगित होणार आहे.काल कामकाज सल्लागार समितीच्या झालेल्या बैठकीत,आज हिवाळी अधिवेशन संस्थगित करायला सभागृहाने संमती दिली आहे.महाराष्ट्र राज्यातील विरोधी पक्षांच्या वतीने,सध्याच्या परिस्थितीत असलेल्या कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावर,मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर व इतर प्रश्नावर उपस्थित झालेल्या गोष्टींवर,सरकारवर टीकेची झोड उठवली.काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी आज चर्चेची सुरुवात केली. दरम्यान विदर्भाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी,मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी,हिवाळी अधिवेशनाची मुदत आणखी काही काळ वाढवावी,अशी विरोधी पक्षांच्या वतीने मागणी केली असता,सरकारने ती फेटाळून उद्याच अधिवेशन संपणार असल्याची घोषणा केली. सरकारने घेतलेला हा निर्णय बहुमताच्या जोरावर रेटून नेला असल्याची टीका,विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
महाराष्ट्र राज्यातील मागास आयोगाच्या मार्फत,मराठा समाज मागासलेला असल्याचे सिद्ध करण्यासाठी,सध्या शासनस्तंरावर मोठी शासन यंत्रणा काम करीत असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी सभागृहाला दिली,तसेच सर्वोच्च न्यायालयात आरक्षण टिकण्यासाठी, निवृत्त न्यायाधीशांच्याकडून योग्य ते मार्गदर्शन घेण्यात येत असून,नव्याने इंपिरिकल डाटा गोळा करण्याची सूचना,राज्य मागास आयोगाला दिली असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी सभागृहाला दिली.एकंदरीत आज नागपूर अधिवेशन संस्थगित होऊन,फेब्रुवारीत मराठा आरक्षण प्रश्नावर,विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.