भारतातील अत्यंत दुर्मिळ व जटील जोखमीच्या मेंदूच्या २५ बायपास शस्त्रक्रिया सिद्धगिरी हॉस्पिटल येथे प्रख्यात न्युरोसर्जन डॉ. शिवशंकर मरजक्के आणि त्यांच्या टीमकडून यशस्वी.!-

0

- पश्चिम महाराष्ट्रातील वैद्यकीय क्षेत्रात मानाचा तुरा !

- मेंदूविकार रुग्णांच्यासाठी नवसंजीवनी !

जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.

(अजित निंबाळकर)

सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर येथे तब्बल २५ रुग्णांच्या मेंदूच्या अत्यंत जटील व दुर्मिळ समजल्या जाणाऱ्या मेंदू बायपास शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडल्या आहेत. मेंदूच्या अशा शस्त्रक्रिया करणारे ग्रामीण भागातील पहिलेच आणि भारतातील मोजक्या ८ ते १० रुग्णालयापैकी एक रुग्णालय म्हणून सिद्धगिरी हॉस्पिटलने वैद्यकीय सेवेच्या क्षेत्रात मानाचा तुरा रोवला आहे.अशा आजाराने ग्रस्त अनेक रुग्णांना मुंबई,दिल्ली सारख्या मेट्रो शहरात जाण्याऐवजी कणेरी मठ येथे उपचार मिळू शकतात,तरी रुग्णांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक व सुप्रसिद्ध न्युरो सर्जन डॉ. शिवशंकर मरजक्के यांनी पत्रकार परिषेदेत केले. 

यावेळी ते पुढे म्हणाले,पुज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामीजींच्या ‘निराधारांना आधार’ या तत्वावर गेल्या एक तपाहून अधिक काळ रुग्णसेवेत समर्पित असणाऱ्या ‘सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर’ ने पश्चिम महाराष्ट्रातील एन.ए.बी.एच. मानांकित धर्मादाय श्रेणीतील अग्रेसर  ‘सेवाभावी मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल’ अशी ओळख निर्माण केली आहे. या सेवा शृंखलेत रुग्णालयातील संस्कार (मेंदू विभाग) विभागाने मेंदूच्या तब्बल २५ बायपास शस्त्रक्रिया करून एक विक्रम स्थापित केला आहे. 

आपण नेहमी ह्रदयाच्या बायपास शस्त्रक्रियेबद्दल ऐकत असतो.पण मेंदूच्या अनेक विकारांच्यात बायपास शस्त्रक्रियेची गरज असते, अशा शस्त्रक्रिया भारतात केवळ मेट्रो सिटीमधील तब्बल ८-१० ठिकाणीच होते. अशा शस्त्रक्रिया क्लिष्ट शस्त्रक्रिया असतात त्यामुळे बायपास शस्त्रक्रिया अत्यंत तुरळक प्रमाणात होतात. त्यामुळे एकाच रुग्णालयात अत्यंत कमी कालावधीत तब्बल २५ शस्त्रक्रिया करण्याची किमया सिद्धगिरी हॉस्पिटलमधील डॉ. शिवशंकर मरजक्के आणि त्यांच्या कुशल टीमने पार पाडले आहे. 

मानवी शरीरात मेंदू सर्व शरीरावर नियंत्रण ठेवण्याचे महत्वाचे काम करत असतो.यासाठी ह्रदयामार्फत प्रवाहित होणाऱ्या रक्तापैकी सुमारे २५% रक्ताचा वापर  मेंदूचे कार्य होण्यासाठी होतो. या रक्ताभिसरणासाठी कैरोटिड आर्टरी (धमनी) मोठ्या मेंदूला रक्त पुरवठा करण्याचे काम करत असते तर व्हर्तेब्रल  आर्टरी (धमनी) लहान मेंदूला रक्त पुरवठा करत असतात. त्या मेंदूमध्ये आत जावून अत्यंत जटील व अत्यंत लहान म्हणजेच केसाच्या तुलनेत दहापट लहान असतात. अनेक वेळा या रक्तवाहिन्यांच्याद्वारे रक्तपुरवठा करण्याचे बंद होते, रक्तवाहिन्या  चोकअप होतात, अशावेळी अशी ब्रेन बायपास शस्त्रक्रिया करणे गरजेचे असते.मेंदूच्या विकारात प्रामुख्याने मोया-मोया आजारात दोन्ही रक्त वाहिन्या रक्तपुरवठा करणे बंद करतात. हा आजार प्रामुख्याने लहान मुलांच्यात  आढळतो. अशावेळी सदर रुग्णास परत परत लकवा मारणे(स्ट्रोक बसणे) अशी लक्षणे दिसतात. अशावेळी रुग्ण कोमात जाण्याची शक्यता जास्त असते. अशी बंद झालेली रक्त वाहिनी ह्रदयरोगातील अन्जिओप्लास्टी सारखी ओपन करता येत नाही. यावेळी बायपास शस्त्रक्रिया हाच उपाय असतो. या विकारांशिवाय अनेक रुग्णांच्यात रक्त वाहिनीला फुगवटा येवून त्या खराब होतात. तसेच काही रुग्णांच्यामध्ये अँथेरोस्केरोसीस विकारामुळे रक्तवाहिन्या  चोकअप होतात. याशिवाय अनेक वेळा मेंदूमध्ये वाढणारा ट्युमर रक्तवाहिनिन्यांच्या भोवती वाढतो व त्यांना सर्व बाजूनी व्यापून टाकतो. अशावेळी रक्तपूरवठा हि बंद होतो. अशा वेळी ट्युमरसोबत रक्तवाहिनीचा तो भाग काढणे गरजेचे असते.अशा वेळी ज्याप्रमाणे एखाद्या ठिकाणी अथवा शहरात वाहतूक कोंडी होते त्यावेळी अशा कोंडीच्या ठिकाणची वाहतूक दुसरीकडे पर्यायी मार्ग काढून आपण बायपास रस्ता तयार करतो अगदी तसेच रक्तपुरवठा करण्यासाठी बायपास मार्ग तयार करावा लागतो. आपल्या सर्व शरीराला संवेदना देण्याचे महत्वपूर्ण कार्य मेंदू करत असतो, मेंदूला योग्य रक्तपुरवठा झाला नाही तर मेंदूतील जीवकोश पेशी एकदा मृत झाल्या तर त्या परत तयार होत नाहीत, त्यामुळे या शस्त्रक्रिया अत्यंत नाजूक व  आवाहनात्मक असतात. 

सिद्धगिरी हॉस्पिटलमध्ये आपण यासाठी प्रामुख्याने दोन प्रकारे या शस्त्रक्रिया करतो. यात पहिल्या प्रकारात रक्त पुरवठा करणाऱ्या वाहिनीसाठी पर्यायी व्यवस्था म्हणून हाताच्या भागातून रक्तवाहिनी काढून (रेडीयल आर्टरी)   मानेच्या भागापासून  नवीन वाहिनी  घालून  मेंदूला पुरवठा करणाऱ्या मुख्य धमनी सोबत जोडली जाते. यासाठी साधारणत: २० सेंटीमीटर इतका धामानीचा भाग शरीराच्या इतर भागातून वापरली जाते. दुसऱ्या प्रकारात कानाच्या जवळून (इथे आपल्याला अनेक वेळा ठोके जाणवतात) केसाच्या खालील भागातून  शस्त्रक्रिया करून धमनी काढून मेंदूच्या मुख्य धमनीला जोडली जाते. यात साधारणत: ८ सेंटीमीटर धमानीचा भाग वापरला जातो. या प्रकारच्या मेंदूच्या शस्त्रक्रिया करत असताना आपल्या डोळ्यांना हि न दिसणाऱ्या अनेक लहान रक्तवाहिन्या असतात, त्यांना कोणतीही इजा न करता तसेच मेंदूच्या इतर कोणत्या हि भागाला दुखापत न करता शस्त्रक्रिया करायच्या असतात. या वाहिन्यांचा  आकार सुमारे १ ते २ मिलीमीटर इतका सूक्ष्म असतो, त्यामुळे अत्यंत अत्याधुनिक अशा मायक्रोस्कोपच्या द्वारेचे हि शस्त्रक्रिया करता येते. लहान क्लिपद्वारे मेंदूतील रोग ग्रस्त धमनी दोन्ही बाजूने बंद केली जाते. मेंदूचा रक्तपुरवठा हा पुरवठा केवळ आपण १५ मिनटांच्या करीतच बंद करू शकतो, कारण यापेक्षा जास्त वेळ लागला तर पेशंटला कायमचा लकवा मारण्याची शक्यता असते, त्यामुळे पर्यायी धमनी १५ मिनिटांच्या आत या भागात जोडावी लागते.त्यामुळे या प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी अत्यंत आधुनिक मायक्रोस्कोप (हायएंड) तसेच मशीन्स लागतात. याशिवाय त्या मशीन चालवणारे अनुभवी कर्मचारी लागतात. यावेळी रुग्णांचे रक्ताची घनता कमी झाली तरी अशा शस्त्रक्रिया अपयशी होवू शकतात, तसेच रुग्णांचा रक्तदाब हि यावेळी जास्त ठेवावा लागतो.तसेच याकालावधीत मेदूचे कार्य पार पडण्यासाठी होणारे राक्ताभिसारणास लागणारा रक्ताचा वापर कमी प्रमाणात ठेवणे व कार्बनडायऑक्साइड संतुलित ठेवणे हे आवाहनात्मक कार्य असते अशावेळी न्युरो भूलतज्ञांची भूमिका महत्वाची भूमिका ठरत असते. वरील सर्व अत्याधुनिक तंत्रज्ञान पुज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामीजींनी सिद्धगिरी हॉस्पिटलमध्ये उपलब्ध करून दिल्या आहेत, तसेच वरील सर्व आवश्यक बाबी व अनुभवी डॉक्टर प्रख्यात न्युरोसर्जन डॉ. शिवशंकर मरजक्के  व प्रख्यात न्युरो भूलतज्ञ डॉ. प्रकाश भरमगौडर, सहाय्यक न्युरोसर्जन डॉ.अविष्कार कढव आणि  कुशल कर्मचारी यांच्यामुळे ग्रामीण भागात असून हि  सिद्धगिरी हॉस्पिटलने अत्यंत कमी कालावधीत ३ ते ४ राज्यातून आलेल्या २५ रुग्णांची  यशस्वी शस्त्रक्रिया केल्या आहेत. सर्व रुग्ण आज पूर्णपणे निरोगी आयुष्य जगत आहेत.  धर्मादाय श्रेणीतील रुग्णालयात इतक्या मोठ्या संख्येने मेंदूच्या बायपास शस्त्रक्रिया हि पहिलीच वेळ आहे. खाजगी रुग्णालयात अशा शस्त्रक्रिया होण्याचे प्रमाण अगदी नगण्य आहे. ही मेंदूच्या शस्त्रक्रियेतील अत्यंत जोखमीची आणि दुर्मिळ शस्त्रक्रिया असून आवाहनात्मक तसेच अत्यंत नाजूक असल्यामुळे हि उपचार पद्धती भारतातील काही मोजक्याच मोठ्या मेट्रो शहरांमध्ये होतात.ह्रदयाची बायपास शस्त्रक्रिया उपचार पद्धत आपल्याला गेली ५० वर्षापासून माहिती आहे पण मेंदूच्या बाबतीत या शस्त्रक्रिया जटील व क्लिष्ट असल्यामुळे तुरळक प्रमाणात होतात त्यामुळे याबाबत लोकांना अधिक माहिती नाही.सिद्धगिरी हॉस्पिटलमध्ये असे हि काही रुग्ण आले होते की ज्यांनी मेट्रो सिटीमधील रुग्णालयात नंबर लावून शस्त्रक्रियेची वाट पाहत होते व शस्त्रक्रियेला विलंब झाल्यामुळे एका डोळ्याची  दृष्टी पूर्णपणे गेली होती व दुसऱ्या डोळ्याची जाण्याच्या मार्गावर होती.अशा रुग्णांचे आम्ही सिद्धगिरी हॉस्पिटल येथे मेंदू बायपास शस्त्रक्रिये केल्यावर सदर रुग्णास दृष्टी आलेली आहे.मेट्रो सिटीमधील या निवडक रुग्णालयात विलंब करण्यापेक्षा रुग्णांना माहिती नसते कि,सिद्धगिरी सारख्या ग्रामीण भागात हि अशा शस्त्रक्रिया उपलब्ध आहेत.त्यामुळे आपण सर्व प्रसार माध्यमाच्या प्रतिनिधीनी हि माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचवावी जेणेकरून गरजू रुग्णांना याचा लाभ व्हावा,असे आवाहन डॉ. शिवशंकर मरजक्के यांनी यावेळी केले. 

यावेळी बोलताना पुज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामीजी म्हणाले, “मेट्रो शहरात होरणाऱ्या या शस्त्रक्रियेला तब्बल १० ते १५ लाखांपर्यंत खर्च अपेक्षित आहेत,मात्र सिद्धगिरी हॉस्पिटल येथे अद्यावत तंत्रज्ञान वापरून हि न नफा न तोटा या तत्वावर केवळ गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा म्हणून नाममात्र खर्चात हि शस्त्रक्रिया होत आहे. समाजातील गरजू व गरीब लोकांच्याकरिता आपण हि माहिती आपल्या माध्यमातून पोहचवावी व या सेवेचा लाभ त्यांना द्यावा. ” 

यावेळी डॉ. शिवशंकर मरजक्के यांनी विविध दृक-श्राव्य (व्हिडीओ) माध्यमांच्या द्वारे सदर जटील व जोखमीची शस्त्रक्रिया कशी केली जाते हे उपस्थित पत्रकारांना दाखवून माहिती विशद केली.यावेळी प्रास्ताविक करताना विवेक सिद्ध यांनी सांगितले कि,डॉ. शिवशंकर मरजक्के हे ब्रेन बायपास, एपिलेप्सी सर्जरी, एंडोस्कोपिक ब्रेन सर्जरी करण्यासाठी भारतातील काही मोजक्या (८-१०) सर्जनांपैकी एक असून त्यांनी  सर्वोत्तम न्यूरो इन्स्टिट्यूटमध्ये प्रशिक्षण घेतले आहे. त्यांनी सर्जरी क्षेत्रात दोनदा सुवर्णपदक प्राप्त केले असून  तब्बल 10000 पेक्षा जास्त गंभीर शस्त्रक्रियांचा अनुभव त्यांना आहे. गेली १०  वर्षे सिद्धगिरीत सेवा देत असून रुग्णांनी त्यांच्या कौशल्याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले तर या पत्रकार परिषदेस  सिद्धगिरी हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक व न्युरो भूलतज्ञ डॉ. प्रकाश भरमगौडर, न्युरोसर्जन डॉ.आविष्कार कढव, डॉ.निषाद साठे, डॉ.स्वप्नील वळीवडे, राजेंद्र शिंदे, कुमार चव्हाण,अभिजित चौगले, सागर गोसावी, प्रसाद नेवरेकर व कोल्हापूर, सातारा, सांगली व बेळगाव येथून पत्रकार उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top