जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
सांगली,मिरज आणि कुपवाड महानगरपालिका एमआयडीसी अंतर्गत उद्योजकांच्या समस्यांवर अनेक वेळा केवळ चर्चा झाल्या,ठोस तोडगा निघाला नाही,अनेक विषय प्रलंबित आहेत.त्यामुळे उद्योजकांचे प्रश्न घेऊन आज सांगली शहर जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी उद्योगभवन, सांगली येथे एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता श्री.नाईक आय.ए.व प्रादेशिक अधिकारी,एमआयडीसी सौ.वसुंधरा जाधव व प्रदूषण नियंत्रण बोर्डाचे उपप्रादेशिक अधिकारी व नवनाथ औताडे यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन दिले.
यावेळी कार्यकारी अभियंता श्री.नाईक यांनी सांगितले की, कुपवाड एमआयडीसी जकात नाका ते सावळीहद्द व मानमोडी पर्यंत रस्ता करणे व दुरूस्तीसाठी रू.१६ कोटीचे टेंडर मंजूर होऊन मा. मंत्री महोदयांकडे सादर केले आहे, लवकरच काम सुरू होईल. तोपर्यंत साईड पट्टया व खड्डे भरून घेण्याचे काम तातडीने पूर्ण करण्यात येईल.कुपवाड एमआयडीसी प्रदूषण नियंत्रणासाठी सीईटीपी सुरू करणे,सांडपाणी व केमिकल ड्रेनेज इ.बाबतीत उपप्रादेशिक अधिकारी प्रदूषण नियंत्रण बोर्ड व कार्यकारी अभियंता आणि प्रादेशिक अधिकारी एमआयडीसी यांची संयुक्त मिटींग मध्ये निर्णय घेऊन प्रश्न निकाली काढण्याचे मान्य केले.
मिरज एमआयडीसी मध्ये मुख्य रस्त्याचे कॉंक्रिटीकरण व अंतर्गत रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येणार आहे.त्यासाठी महापालिका आयुक्त मा.सुनिल पवार यांनी औद्योगिक वसाहतीच्या करातून जमलेल्या निधी पैकी २५% टक्के निधी देण्यासाठी सकारात्मक आहेत.वाहनतळ व विस्तारीकरणासाठी नवीन प्लॉटची मागणी धोरणात्मक असल्याने शासनाकडे कळविण्यात येईल असेही यावेळी अधिका-यांनी सांगितले.
यावेळी पृथ्वीराज पाटील यांच्या बरोबर शिष्टमंडळ चर्चेत मराठा उद्योजक असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील, सचिव शंकर रकटे,खजिनदार रामदास चव्हाण,संचालक प्रशांत देसाई,बामणोली औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष अनंत चिमड व कॉंग्रेस शहर जिल्हा औद्योगिक कक्षाचे अध्यक्ष अजय देशमुख यांनी भाग घेतला.प्रा.एन.डी.बिरनाळे व सनी धोतरे आदि उपस्थित होते.