मुंबईत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण झालेल्या,"अटल बिहारी वाजपेयी सेतू"विषयी विशेष माहितीपूर्ण दृष्टिक्षेप.!--

0

 जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.

(अनिल जोशी)

मुंबईतील शिवडी ते पनवेल उरण रस्त्यावरील चिरले गावापर्यंत असलेल्या या २१.८ किलोमीटर सागरी सेतूचे लोकार्पण १२ जानेवारी,२०२४ रोजी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचे हस्ते झाले.एकूण लांबीपैकी १६.५ किलोमीटर समुद्र/खाडी पाण्यावरून आहे.लांबीने भारतातील हा सर्वात मोठा तर जगात बारावा सेतू.फोर्ट,कुलाबा असे महत्वाचे भाग ज्या दक्षिण मुंबईत येतात, त्या दक्षिण मुंबईला नव्या मुंबईशी जोडणारा हा सेतू.एरवी दीड ते दोन तास लागणारा प्रवासाचा वेळ या सेतूने फक्त वीस मिनिटांवर आणला आहे.पूर्ण उन्नत मार्ग असल्याने वाटेत सिग्नल,क्रॉसिंग असे अडथळे नाहीत.प्रत्येकी बाजूस तीन लेन अशा एकूण सहा लेनमुळे वाहने गतीने जाऊ शकतात.

पुलाचे बांधकाम एल अँड टी,टाटा प्रोजेक्ट,जपान मधील आय एच आय कॉर्पोरेशन,कोरियाची भारतातील उपकंपनी दाउ इंजिनिअरिंग आणि ऑस्ट्रियाची स्टारबग इन्फ्रास्ट्रक्चर यांनी केले आहे.हा सेतू बांधताना तांत्रिकदृष्ट्या अनेक अनोख्या गोष्टी वापरात आणल्या आहेत त्या अशा...

१.पूल भूकंपाचा ६.५ रिष्टर स्केलचा धक्का सहन करू शकेल असे डिझाइन केले आहे.यात पुलाचे खांब लवचिकता ठेवत कंप पावतील त्यामुळे त्याला तडे जाणार नाहीत.खांबावर जे आडवे बीम किंवा डेक असतात ते खांबावर एका विशिष्ट बॉल बेअरिंगवर ठेवलेले असल्याने भुकंपाचे वेळी खांब कंप पावले तरी डेक बेअरिंगवर हलले जातील आणि त्यास नुकसान पोहोचणार नाही.

२.पुलाच्या खांबांचा समुद्र तळातील पाया Caisson Concrete या पद्धतीने केल्याने तो पूर्ण वॉटरप्रूफ झाला आहे.समुद्र तळातील पाया खणताना Reverse Circulation Drilling ही पद्धत वापरली आहे.त्यामुळे पाण्यात ड्रिलिंग करताना अत्यन्त कमी आवाज आणि कंपने निर्माण झाली ज्यामुळे समुद्री जीवांना त्रास झाला नाही किंवा ते स्थलांतरित झाले नाहीत.

३. पुलाचे डेक ऑर्थोस्कोपीक काँक्रीट या पद्धतीने केल्याने त्यात अधिक ताकत,लवचिकता आणि भार क्षमता आली आहे.त्यामुळे दुसरा एक फायदा झाला तो म्हणजे डेक अधिक लांबीचे बनवणे शक्य झाले ज्यामुळे खांबांची संख्या कमी झाली. या डेकसाठी ८५,००० टन विशिष्ट प्रकारचे स्टील लागले.तसेच डेकसाठी ज्या वेगळ्या (Prestressed) स्टील वायर लागल्या त्याची लांबी इतकी आहे की त्याने पृथ्वीला चार प्रदक्षिणा होतील.

४. पुलाच्या बांधकामासाठी १४,००० प्रशिक्षित आणि ५,००० अ-प्रशिक्षित कामगारांनी काम केले.तर एकूण बांधकामासाठी ट्रक,डंपर आणि काँक्रिट मिक्सरचे एकूण रनिंग जवळपास ३,८५,००० किलोमीटर,म्हणजे पृथ्वी आणि चंद्राच्या अंतराइतके झाले.

५. पुलावर रात्रीसाठी जे लाईट बसवले आहेत ते खास प्रकारचे आहेत.त्यामुळे रात्री लाईटचा प्रकाश पाण्यावर न जाता फक्त रस्त्यावर पडतो.समुद्री जलचरांवर रात्री लाईट पडून त्यांचेवर अनिष्ट परिणाम होऊ नये म्हणून ही योजना.लाईटसाठी एकूण १,२१२ खांब रस्त्याच्या मधल्या पट्टीवर आहेत.

६.पूल ज्या ठाणे खाडीवरून जातो त्यातील बराचसा भाग स्थलांतरित फ्लेमिंगो पक्ष्यांचा अधिवास आहे. फ्लेमिंगोना पुलावरून जाणाऱ्या वाहनांच्या आवाजाचा त्रास होऊ नये म्हणून पुलाच्या कठड्यावर ध्वनी प्रतिबंधक विशिष्ट पडदे उभे केले आहेत. 

७.टोल घेण्यासाठी नवी प्रणाली,Open Road Tolling - (OTR),वापरली आहे. प्रगत देशात ती सर्वत्र वापरली जाते पण आता भारतात प्रथमच.यात गाडीचा वेग कमी न करता आहे त्या वेगात गाडी जात असताना प्रगत कॅमेरे आणि स्कॅनर टोल जमा करून घेतील.त्यामुळे टोल नाका,बूम बॅरिअर नसणार.एकदा टोल घेतल्यावर तीच गाडी २४ तासाच्या आत परत टोलला आली तर तोच फास्टटॅग पाहून सवलतीच्या दराचा टोल घेतला जाईल.

८.पुलाचे कठडे, क्रॅश बॅरिअर,१.५५ मीटर उंचीचे आहेत.पूर्ण भरलेला ट्रक १०० किलोमीटर वेगाने कठड्यावर धडकला तरी ती धडक सहन करेल असे मजबूत त्याचे डिझाइन आहे.

९.पुलावर काही अंतरा अंतरावर इलेक्ट्रॉनिक रिअल टाइम डिस्प्ले असतील.त्यावर पुलावर पुढे काही ट्राफिक अडचण आहे का,अपघात झाला आहे का,एखादी लेन काही कारणाने बंद आहे का इत्यादी माहिती वाहन चालकास मिळू शकेल.

१०. पुलाचा रस्ता करण्यासाठी जी भर घातली आहे ती Stone Matrix Asfalt या प्रकारची वापरली आहे.त्यात वेगळे रासायनिक डांबर (Asphalt) मिसळले आहे.याचा एकत्रित परिणाम अधिक मजबुती,रस्यावर पाण्याचा परिणाम न होणे,ओल्या रस्त्यावर गाड्या न घसरणे,मार्किंग पट्ट्या अधिक स्पष्ट दिसणे आणि टायरचा रस्त्यावर घासून येणारा आवाज कमी होणे असे आहेत.ही भर कधी काढावी लागली तर परत वापरता येईल.

११. पुलावरील १९० व्हिडिओ कॅमेरे पुलावर काय चालू आहे ते दाखवतील.वेगळे १३० कॅमेरे ट्रॅफिक नियंत्रणास मदत करतील. ३६ कॅमेरे पुलाच्या खालच्या बाजूला बसवले आहेत जे सुरक्षिततेच्या दृष्टीने पुलाखाली आणि पाण्यावर लक्ष ठेवतील.

१२. पुलाचे पाण्यात एकूण १,०८९ खांब आहेत.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top