जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
सेंद्रिय व विषमुक्त शेतीतील प्रश्न मोर्फा संघटनेच्या माध्यमातून समजून घेऊन ते प्रश्न राज्य व केंद्र सरकार पुढे मांडणार असून, त्याची सोडवणूक होईपर्यंत आपण त्याचा पाठपुरावा करू असे मत माजी केंद्रीय कृषिमंत्री खा.शरद पवार यांनी व्यक्त केले.१९ जानेवारी रोजी मंगळवेढा येथील सामी फॅमिली क्लब अँड रिसॉर्ट येथे महाऑरगॅनिक अँड रेसिड्यू फ्री फार्मर्स असोसिएशन महाराष्ट्र राज्य अर्थात मोर्फा व आम्रपाली ॲग्रो टुरिझम यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या सेंद्रिय शेती कार्यशाळेत खासदार पवार बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, काँग्रेसचे सोलापूर शहराध्यक्ष चेतन नरोटे,विठ्ठल शुगरचे अध्यक्ष अभिजीत पाटील,मोर्फाचे अध्यक्ष कृषिभूषण अंकुश पडवळे,आम्रपाली ऍग्रो टुरिझमच्या संचालिका सुदर्शना आनंद लोकरे,मोर्फाचे संचालक हरिभाऊ यादव,पाणी संघर्ष समितीचे ॲड भारत पवार,गटविकास अधिकारी आनंद लोकरे,रणजीत जगताप,संजय कट्टे,मोर्फाचे जिल्हाध्यक्ष संजय दिघे आधी उपस्थित होते.
पुढे बोलताना पवार म्हणाले की,सेंद्रिय व विषमुक्त शेतीमध्ये उत्पादनाबरोबर मार्केटिंगचा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यासाठी त्याची विश्वासार्हता अत्यंत महत्वपूर्ण आहे.शेती क्षेत्रात बदल होत आहेत त्या बदलाची नोंद घेऊन आपण पावले टाकली पाहिजे.मोर्फा संघटना राज्यात विषमुक्त व सेंद्रिय शेतीतील प्रश्न शासनाच्या निदर्शनास आणत आहे. सेंद्रिय व विषमुक्त शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत शासनाच्या धोरणात बदल करण्यासाठी आपण संबंधित मंत्र्यांबरोबर येणाऱ्या निवडणुकांचा कालावधी संपल्यानंतर बैठका घेऊन सेंद्रिय व विषमुक्त मालाचे उत्पादन वाढवणे व मार्केटिंग साठी मदत करू असे पवार यांनी बोलताना आश्वासन दिले.
मोर्फाचे अध्यक्ष कृषिभूषण अंकुश पडवळे बोलताना म्हणाले की,सेंद्रिय व विषमुक्त शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत.शेतकरी अत्यंत चांगल्या पद्धतीने उत्पादन घेत आहेत पण मार्केटिंग मध्ये शासनाच्या मदतीची अत्यंत गरज आहे. खा.शरद पवार यांनी राज्य व केंद्र सरकार बरोबर सेंद्रिय शेतीच्या प्रश्नाबाबत अनेक बैठका घेऊन राज्याचे सेंद्रिय शेतीचे धोरण बनवण्यामध्ये पवार साहेबांचा महत्त्वाचा वाटा आहे. यापुढे आपणाला नैसर्गिक शेतीपेक्षा शाश्वत सेंद्रिय शेतीची गरज असून त्या दृष्टीने मोर्फा संघटना राज्यामध्ये पावले टाकत असल्याचेही पडवळे यांनी बोलताना सांगितले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक मोर्फाचे संचालक हरिभाऊ यादव यांनी केले.सदर सेंद्रिय शेती कार्यशाळेस सोलापूर जिल्ह्यातील सेंद्रिय व विषमुक्त शेती करणारे शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी संतोष दुधाळ,नितीन मोरे,अनिल वगरे, संजय दवले,बाळासाहेब यादव,यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारत मुढे यांनी केले.
"सेंद्रिय शेतीबरोबर शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायाला अतिशय महत्त्व आहे.विषमुक्त व अँटिबायोटिक दुध उत्पादन काळाची गरज असून अशा दुधाला योग्य किंमत मिळण्यासाठी शासन व खा.शरद पवार यांच्याकडे आमचा पाठपुरावा सुरू आहे.दूध उत्पादकांना उत्पादन खर्चावर आधारित दर मिळाला व ए टू मिल्क दुधाला चांगली बाजारपेठ मिळाल्यास सेंद्रिय शेती करणारा शेतकरी आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्यास मदत होईल"असे कृषीभूषण अंकुश पडवळे यांनी सांगितले.
मंगळवेढा येथील सेंद्रिय शेती कार्यशाळेत बोलताना खा.शरद पवार यावेळी व्यासपीठावर मोर्फाचे चे अध्यक्ष अंकुश पडवळे, सुदर्शना आनंद लोकरे,ऍड भारत पवार,हरिभाऊ यादव आदी उपस्थित होते.