जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी शहरातील ‘इचलकरंजी अॅग्रो फूडस् अॅण्ड ग्यामा एन्टरप्रायझेस’ या कंपनीकडून प्राण्यांच्या कातड्यावर प्रक्रिया केलेले,तसेच कत्तलखान्याचे रक्त आणि मांसमिश्रीत सांडपाणी विनाप्रक्रिया ओढ्यात सोडले जाते.या पाण्यात विषारी घटक असल्यानेे नागरिकांना आरोग्याच्या समस्या भेडसावत आहेत,तसेच नागरिकांना त्वचेचे विकारही होत आहेत.या संदर्भात वारंवार महापालिकेकडे,तसेच प्रदूषण मंडळाकडे तक्रार करून संबंधित आस्थापनेस नोटिसा पाठवण्याच्या व्यतिरिक्त आजपर्यंत कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. तरी इचलकरंजीतील हा कत्तलखाना कायमस्वरूपी बंद करावा या मागणीसाठी सोमवार,26 फेब्रुवारीला ‘कत्तलखान हटाव-पंचगंगा बचाव’ मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.हा मोर्चा सकाळी 11 वाजता शिवतीर्थ (जय हिंद मंडळ) येथून प्रारंभ होईल.जनता बँकमार्गे प्रांत कार्यालय येथे त्याचा समारोप होईल,अशी माहिती समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटक श्री.सुनील घनवट यांनी दिली.
या प्रसंगी प.पू.संतोष-बाळ महाराज,आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे जिल्हामंत्री श्री.पंढरीनाथ ठाणेकर,जिल्हा विशेष संपर्कप्रमुख श्री.संतोष हत्तीकर,जिल्हा कार्याध्यक्ष श्री.दत्ता पाटील,शिवभक्त श्री.आनंदा मकोटे, या हिंदु जनजागृती समितीचे श्री.शिवानंद स्वामी आणि श्री.किरण दुसे,श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री.प्रसाद जाधव,विश्व हिंदु परिषदेचे शहराध्यक्ष श्री.बाळासाहेब ओझा,हिंदुत्वनिष्ठ श्री. नितीन काकडे उपस्थित होते.
प.पू. संतोष-बाळ महाराज म्हणाले, ‘‘इचलकरंजी अॅग्रो फूडस् अॅण्ड ग्यामा एन्टरप्रायझेस’ अशा प्रकारचे कत्तलखाने ‘अॅग्रो फूडस्’ असे शेतीशी संबंध नसणारी नावे ठेऊन शासन आणि जनता यांची फसवणूक करत आहेत. इचलकरंजी येथे प्रदूषण मंडळ सायझिंगसारख्या वस्रव्यवसायाशी संबंधित असणार्या आणि अनेकांचे पोट भरणार्या व्यवसायावर कारवाई करते, तर प्रदूषण करणार्या कत्तलखान्यावर मात्र कारवाई करत नाही,हे कशाचे लक्षण आहे ?आजपर्यंत कत्तलखान्यावर एकदाही कारवाई का नाही ?’’
श्री.शिवानंद स्वामी म्हणाले ‘‘पंचगंगेचे हेच पाणी पुढे लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे मिसळते. त्यामुळे याचा पाण्याने पवित्र दत्तात्रेयांच्या पादुकांना अभिषेक होणे आणि भाविकांनी त्यात स्नान करणे यामुळे भाविकांच्या धार्मिक भावनांना ठेच पोचत आहे.’’
श्री.पंढरीनाथ ठाणेकर म्हणाले, ‘‘हा कत्तलखाना महापालिकेच्या जागेवर असून या कारखान्यात प्रतिदिन 350 ते 400 जनावरांची कत्तल केली जाते.मोठ्या प्रमाणात रक्त आणि मांसमिश्रीत पाणी परिसरात पसरत असल्याने या परिसरात डास,माशा आणि इतर किटक यांचे प्रमाण वाढल्याने नागरिकांना डेंग्यू,मलेरिया यांसारखे धोकादायक आजार होत आहेत. या ठिकाणी भटक्या कुत्र्यांचा उच्छाद झाला आहे.ही कुत्री प्रतिदिन मांस खाऊन हिंसक बनली आहे.’’ श्री.संतोष हत्तीकर म्हणाले, ‘‘संबंधित आस्थापनेकडून नियमांचे पालन होत नाही हे स्पष्ट दिसत असतांना महापालिकेने संबंधित आस्थापनेची पाणीजोडणी तोडणे,तसेच अन्य कृती का केल्या नाहीत ? या आस्थापनेस महापालिकेने केवळ एक रुपये नाममात्र दराने जमीन दिली आहे.कत्तलखान्याकडून सर्व नियमांची पायमल्ली होत असतांना त्यांच्यावर कारवाई का होत नाही ? यावरून महापालिका प्रशासन ‘इचलकरंजी अॅग्रो फूडस् अॅण्ड ग्यामा एन्टरप्रायझेस’ या आस्थापनेस जाणीवपूर्वक वाचवण्याचा प्रयत्न करते,असे स्पष्ट दिसते.’’
‘इचलकरंजी अॅग्रो फूडस् अॅण्ड ग्यामा एन्टरप्रायझेस’ ही आस्थापना कायमस्वरूपी बंद करण्यात यावी,या आस्थापनेवर कोणतीच ठोस कृती न करता जनता,समाज यांचे आरोग्य धोक्यात आणल्याविषयी आणि पर्यावरणाची हानी केल्याविषयी सर्व संबंधित अधिकारी यांच्यावर फौजदारी गुन्हे नोंद करावे,या मागण्यांसाठी मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.या मोर्चासाठी आजूबाजूच्या अनेक गावांमध्ये बैठका चालू असून मोर्चात सहभागी होण्यासाठी 7020710460, 9156920520 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.