जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
केंद्र सरकारच्या कांद्याच्या निर्यात बंदी धोरणाच्या पार्श्वभूमीवर,आज लासलगाव बाजार समिती कांद्याच्या दरात फार मोठी घसरण झाली असून,प्रतिक्विंटल 400 ते 500 रुपयांनी कांद्याचे दर घसरले आहेत.त्यामुळे सर्व जिल्ह्यातील शेतकरी संघटना एकवटल्या असून,तीव्र आंदोलनाच्या तयारीत असल्याचे दिसत आहे.आज मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा लासलगाव बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत,लासलगाव बाजार समितीच्या सभागृहात बैठक झाली असून,या बैठकीत तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
केंद्र सरकारने लादलेली कांदा निर्यात बंदी त्वरित मागे घ्यावी अन्यथा मोठे आंदोलन उभारण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला असून,सदरहू बैठकीला महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना,स्वाभिमानी शेतकरी संघटना, रयत क्रांती शेतकरी संघटना,छावा क्रांती शेतकरी संघटना, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सदस्य उपस्थित होते.
दरम्यान केंद्र सरकारचे कांदा व द्राक्षासह इतर शेतमाला संदर्भात जे धोरण राबवले जात आहे ते अत्यंत निराशजनक असून,सरकारकडून वारंवार शेतकऱ्यांच्या भावनाशी खेळ केला जात आहे असा आरोप मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर यांनी केला आहे. पिंपळगाव बाजार समितीत देखील लाल कांद्याचे दर जवळपास 200 रुपयांनी घसरल्याचे चित्र दिसून आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. एकंदरीत कांद्याच्या दरात झालेली घसरणीमुळे देशातील शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरल्याचे चित्र दिसून येत आहे.