जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
विकसित भारताचा व पायाभूत सुविधांच्या विकासाचा समतोल राखणारा अंतरिम अर्थसंकल्प,केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत सादर केला.देशामधील सध्याच्या कररचनेत कोणताही नवीन बदल करण्यात आला नसून,महिला,मध्यमवर्ग व शेतकऱ्यांना थोडाफार दिलासा अर्थसंकल्पात दिला गेला आहे.देशातील पायाभूत सेवांच्या विकासासाठी सुमारे 11.11लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून,आज संसदेत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलेल्या भाषणात मागील 10 वर्षात केलेल्या कामांचा लेखाजोगा सांगितला आहे.
देशातील पर्यटन,गृहनिर्माण व अपारंपारिक ऊर्जा क्षेत्राला मात्र बूस्टर डोस देण्यात आला आहे.केंद्राने 2024 -25 या वर्षासाठी अन्नधान्य,खते,इंधनावर दिल्या जाणाऱ्या अंशदानात 8 टक्क्याने कपात करण्याचा प्रस्ताव ठेवून,मनरेगासाठी वाढीव तरतूद करण्यात आली आहे.देशातील रस्ते,बंदरे, विमानतळ आदींच्या पायाभूत सुविधासाठी 11% खर्च वाढवण्यात आला असून,मध्यमवर्गीयांसाठी नवी गृहनिर्माण योजना सुरू केली जाणार आहे.त्यामध्ये 5 वर्षात सुमारे 2 कोटी घरांची निर्मिती करण्यात येईल.देशातील रस्ते वाहतूक व महामार्गासाठी 2.78 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून,रेल्वे मंत्रालयासाठी 2.55 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ग्रामीण विकासासाठी 1.77 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, गृहमंत्रालयासाठी 2.03 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.संरक्षण खात्यासाठी 6.20 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून,मनरेगासाठी 86000 कोटी रुपये तर आयुष्यमान भारत योजनेसाठी 7500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
दरम्यान सन 2014 मध्ये आपण कोठे होतो.? व आता कोठे आहोत.? हे पाहण्याची गरज असून,राष्ट्र प्रथम या दृढविश्वासावर सरकार यशस्वी झाले असल्याची प्रतिक्रिया केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली आहे.महाराष्ट्र राज्यातील रेल्वेला मात्र प्रकल्पांसाठी 15,554 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली असून,यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांना गती देण्याचा संकल्प केल्याचे दिसत आहे.देशातील विरोधी पक्षांच्या नेत्यांनी मात्र काल संसदेत सादर केलेल्या अर्थसंकल्पावर टीका केली आहे.एकंदरीतच यंदाच्या आगामी येणाऱ्या देशातील निवडणुकीपूर्वीचा अर्थसंकल्प जनतेला कसा वाटतो बघावे लागेल.