जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व चिन्ह राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाकडे राहणार असल्याचा स्पष्ट निकाल,विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला आहे.सध्याच्या विधिमंडळात असलेल्या बहुमताच्या आधारावर सदर निकाल दिला असून,53 आमदारांपैकी 41 आमदारांचा पाठिंबा,राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार गटास असल्याची माहिती,विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली आहे.
दोन्हीही गटाच्या आमदारांना पात्र ठरवले असून,दोन्हीही गटानी अपात्रतेविषयी दाखल केलेल्या याचिका फेटाळून लावल्या आहेत.महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली असलेला पक्ष हा मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचा निकाल,विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला असून,राज्यघटनेतील तरतुदी व सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचना विचारात घेऊन,सदरहू निकाल दिला असल्याची माहिती त्यांनी दिली.
सध्या विधिमंडळातील परिस्थिती लक्षात घेता अजित पवार गटच मूळ राष्ट्रवादी पक्ष असून,विधिमंडळात त्यांचेकडे निर्विवाद बहुमत असल्याचे स्पष्ट झाले आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कोणतीही फूट पडली नसून,फक्त दोन गट तयार झाले आहेत.त्यामुळे त्याच्या आधारावर पक्षविरोधी कारवाई करता येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
सदरहू निकालामुळे मला धक्का बसला नसून,आश्चर्यही वाटले नसल्याचे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे.एकंदरीत सदरहू निकालानंतर,यापुढील भविष्यातील राजकीय समीकरणांची स्थिती कशी राहील? हे बघणे हितावह ठरेल.