जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
कराड-तासगांव-शिरढोण- कवठे महांकाळ-जत या राष्ट्रीय महामार्गावरील तासगाव तालुक्यातील मणेराजुरी व बोरगाव येथील काम बरेच दिवस प्रलंबीत होते.हे काम लवकरात लवकर व्हावे यासाठी खासदार संजयकाका पाटील यांनी केंद्रिय रस्ते विकास व राजमार्ग मंत्री मा. नितीन गडकरी यांचेकडे मागणी केली होती.
आज या मागणीनुसार मणेराजुरी व बोरगाव येथील राष्ट्रीय महामार्गाच्या प्रलंबीत कामांकरीता रक्कम रु.२५ कोटी इतका निधी मंजूर करण्यात आला असून लवकरच याबाबतची निविदा प्रक्रिया पूर्ण होवून प्रत्यक्ष कामास प्रारंभ होईल,अशी माहिती खासदार संजयकाका पाटील यांनी दिली.
खासदार संजयकाका पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, कराड-तासगांव-शिरढोण- कवठे महांकाळ-जत या राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम प्रगतीपथावर आहे. यापैकी कराड ते तासगांव या भागाचे काम अंतिम टप्यात आले आहे.तसेच तासगांव ते शिरढोण या एकूण २३ कि.मी. लांबी पैकी २०.७८७ कि.मी. लांबीचे काम पूर्ण झाले आहे.उर्वरित २.२१२ कि.मी.लांबी ही जमिनीचे भूसंपादन झाले नसलेने करण्यात आले नाही.सदरची लांबी ही मणेराजुरी व बोरगांव या गावातून जात असून तो पुढे राष्ट्रीय महामार्ग क्र.१६६ वरील शिरढोण येथे जावून मिळतो.या ठिकाणी रस्त्याचे काम झाले नसल्याने तेथे वारंवार अपघात होत होते.तसेच हा रस्ता अत्यंत रहदारीचा व सांगली जिल्हयातील अत्यंत महत्त्वाचा रस्ता आहे.या रस्त्याचे कामाकरीता निधी मिळाल्याने व हे काम लवकरच पूर्ण होणार असलेने समाधान व्यक्त होत आहे.