आरोग्य भाग- 41.
जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
शारीरिक आरोग्यास गुणकारी आयुर्वेदिक वनस्पती असलेल्या चमेलीची पाने,फुले,मुळे यासंबंधी माहिती खाली देत आहोत.
▪️अम्लपित्तामुळे किंवा उष्णतेमुळे जीभेला वा तोंडात छाले निर्माण होण्याचा त्रास अनेकांना होत असतो.त्यामुळे तिखट खारट खाल्ले की खूप त्रास होतो.काहीही लावले तरीही आराम पडत नाही अशावेळी चमेली पानांचा काढा करून तोंडात धारण करावा लगेच आराम पडतो. चमेली पानं वाटून व्रणांवर लावावे.दात दुखत असतील तर चमेली पत्र चावावीत.
▪️चमेलीची पाने उत्तम व्रणरोपक म्हणजेच जखमा भरून काढते.चमेलीपत्रसिद्ध तेल लावावे.चमेलीपत्र कुष्ठघ्न आणि कण्डूघ्न सांगितले आहे.शरीरावर खाज सुटत असेल किंवा त्वचारोग असेल तर चमेली पत्र वाटून त्याचा लेप लावावा. खाज सुटणे कमी होते.अनेक त्वचारोग उदा.एक्जीमा,फंगल इन्फेक्शन इ.मधे चमेलीपत्रसिद्ध तेल अथवा पानांचा मूळाचा लेप लाभदायक ठरतो.
▪️डोकेदुखी असेल तर चमेलीच्या मूळांचा काढा करुन त्याचा परिषेक करतात.शिरःशूल चक्कर येणे अथवा मानसिक दौर्बल्यात चमेली तेलाने डोक्याला मालिश केल्याने आराम मिळतो.
▪️थंडीमुळे किंवा पाण्यात सतत काम करण्याने तळपायाला भेगा पडतात अशावेळी चमेलीची पाने वाटून लेप भेगांवर लावावा जखमा लवकर भरतात चमेलीपत्र सिद्ध तेलाने हळूहळू मालीश करावी त्यामुळे तळपाय पुन्हा मऊ व प्राकृत होतात.
▪️कान दुखणे कानात स्त्राव निघणे अशा तक्रारींवर पानांनी सिद्ध तेल कानात टाकल्यास त्रास कमी होतो.
▪️ मासिक स्त्राव व्यवस्थित होत नसेल किंवा अवरोध असेल तर पत्र व पुष्प लेप ओटीपोटावर लावतात.
▪️अतिकाम किंवा कमी झोप यामुळे चिडचिडेपणा मानसिक अस्वस्थता जाणवते. अशावेळी चमेलीच्या फुलांचा सुगंध घेतल्यास स्ट्रेस कमी करण्यास मदत होते.अरोमाथेरपी प्रमाणे याचा उपयोग होतो.चमेली पुष्प वाजीकर आहेत.या फुलांचा सुगंध वाजीकरण करणारा आहे.
▪️रक्तविकारांवर चमेली खूप प्रभावी कार्य करते.अनेक औषधी कल्पांमधे चमेलीचा वापर करण्यात येतो.जात्यादी तेल जात्यादी घृत इ.चमेली वापरून केलेली औषधी कल्प आहेत. गंडूष चिकित्सा,लेप,कवलधारण,मालीश तसेच आभ्यंतर सेवनाकरीता वैद्य चमेली कल्पांचा वापर करतात.अशी ही चमेली ; उत्तम त्वक् रोगहर मुखरोगहर व्रण रोपक व याची फुले उत्तम वाजीकर व सौमनस्य जनन आहेत.
हा लेख डॉ.प्रमोद ढेरे यांचा असून,आरोग्य आणि समर्थ सोशल फाउंडेशनचे श्री.संतोष सावंतसर यांचे कडून संपादन करून,जनहितार्थ प्रसिद्ध करण्यात येत आहे.