जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी,महायुती मधील जागा वाटपाच्या प्रश्नावर व निवडणूक रणनीतीवर चर्चा करण्यासाठी,पक्षाचे मंत्री,खासदार,आमदार यांची बैठक बोलावली असल्याचे वृत्त आहे.महाराष्ट्र राज्यातील महायुती मधील घटक पक्षांचा जागा वाटपाचा घोळ अजूनही सुटलेला नाही.महायुतीच्या घटक पक्षांनी काही जागांच्या बाबतीत अडवणुकीची भूमिका स्वीकारली असल्याच्या पार्श्वभूमीवर,आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी,पुण्यामध्ये बैठक बोलावली असून,या बैठकीस दुपारी 12:00 वाजता बोट क्लब येथे सुरुवात होणार आहे.त्याचबरोबर राष्ट्रवादीचे सर्व मंत्री महोदय,आमदारांनी,खासदारांनी उपस्थित राहावे अशा सूचना दिल्या असल्याची चर्चा आहे.
महाराष्ट्र राज्यातील महायुतीच्या जागा वाटपात,भारतीय जनता पक्ष,शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस हे तीन घटक पक्ष असून,त्यांच्यात जागा वाटपाच्या वरून अद्यापही घोळ कायम असून,महायुतीच्या घटक पक्षांकडून काही जागांवर दावे- प्रतिदावे सुरू आहेत.महाराष्ट्र राज्यात सध्या परिस्थितीत महायुतीमध्ये,महाराष्ट्र नवनिर्माण सेना,राष्ट्रीय समाज पक्ष हे पक्ष सामील होत असल्याने,संभाव्य निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा होण्याची दाट शक्यता आहे.
दरम्यान भारतीय जनता पार्टीने उदयनराजे भोसले यांच्यासाठी,सातारच्या जागेवर हक्क सांगितला असून, सध्या या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार असल्याने,या जागेवरचा हक्क राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.एकंदरीत महायुती मधील घटक पक्षांचा जागा वाटपांचा प्रश्न लवकर सुटेल,असे वाटत नाही.