जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
कृष्णा कॅनॉलच्या आवर्तनाकरिता तारळी धरणातून (खोडशी बंधारा) पाणी टंचाईअंतर्गत कृष्णा कॅनॉलमध्ये अतिरिक्त १ टी.एम.सी.पाणी लवकरच सोडण्यात येणार आहे.त्याबाबतचा प्रस्ताव सांगली व सातारा जिल्हाधिकारी यांचेकडून जिल्हास्तरीय आकस्मित पिण्याचे पाणी निश्चिती समिती यांचेमार्फत कार्यकारी संचालक,पाटबंधारे विकास महामंडळ यांच्याकडे पाठविण्यात आलेला असून सदर प्रस्तावास मंजुरी मिळून कृष्णा कॅनॉलचे आवर्तन सुरु होवुन पाणी सोडले जाणार आहे,अशी माहिती खासदार संजयकाका पाटील यांनी दिली.खासदार संजयकाका पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार,सध्या सांगली जिल्ह्याला भेडसावत असलेल्या पाण्याच्या प्रश्नासाठी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत तसेच संबंधित विभागांच्या सर्व प्रतिनिधींच्या सोबत बसून मार्च ते जून पाण्याचे नियोजन करण्यात आले आहे.दि.९ मार्च २०२४ रोजी सांगली येथील पाटबंधारे कार्यालय येथे बैठक पार पडली होती.या बैठकीस कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक श्री.अतुल कपोले,अधीक्षक अभियंता श्री चंद्रशेखर पाटोळे व संबंधित अधिकारी देखील उपस्थित होते.
सदर बैठकीमध्ये कृष्णा कॅनॉल साठी तारळीमधून १ टीएमसी पाण्याची मागणी केलेली होती,सदर पाणी तारळी धरणातून (खोडशी बंधारा) कृष्णा कॅनॉलमध्ये पाणी उपलब्ध करुन देण्याबाबत निर्णय घेण्यात आलेला होता.सदर मागणीप्रमाणे दोन्ही जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि जिल्हास्तरीय आकस्मित पिण्याचे पाणी निश्चिती समिती यांचेमार्फत कार्यकारी संचालक,पाटबंधारे विकास महामंडळ यांच्याकडे प्रस्ताव पाठवून त्यास मंजूरी देण्यात आलेली आहे.त्यामुळे तारळी धरणातून (खोडशी बंधारा) कृष्णा कॅनॉलमध्ये पाणी सोडण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे, असेही खासदार संजयकाका पाटील यांनी सांगितले.