जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
महाराष्ट्र राज्यातील विदर्भ व मराठवाडा येथील लोकसभेच्या जागेंसाठी,सत्ताधारी महायुतीकडून व विरोधी पक्षांच्या महाविकास आघाडीतून,दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले असून,उमेदवारांचे उमेदवारी अर्ज दाखल करताना सर्वपक्षीयांकडून शक्ती प्रदर्शन करण्यात आले आहे.महाराष्ट्र राज्यात सध्या मेळावे,बाईक रॅली,प्रचार नियोजनाच्या बैठका आदींमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.महाराष्ट्र राज्यात विदर्भ व मराठवाड्यातील सर्वपक्षीय उमेदवारांनी,दुसऱ्या टप्प्यातील लोकसभेसाठी उमेदवारीचे अर्ज वाजत-गाजत भरले आहेत.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या उपस्थितीत हिंगोली मतदारसंघातून बाबुराव कदम कोहळीकर यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे.नांदेड येथे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत, भारतीय जनता पार्टीचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांनी शक्ती प्रदर्शनाद्वारे उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
महाराष्ट्र राज्यात दुसऱ्या टप्प्यातील विदर्भातील व मराठवाड्यातील,बुलढाणा,अकोला,अमरावती,वर्धा, यवतमाळ- वाशिम,हिंगोली,नांदेड,परभणी या मतदारसंघात 26 एप्रिल रोजी मतदान होत असून,अमरावतीच्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार नवनीत राणा यांनी,राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
दरम्यान अमरावती मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार खासदार नवनीत राणा यांना सर्वोच्च न्यायालयाकडून फार मोठा दिलासा मिळाला असून,त्यांचे जात प्रमाणपत्र वैद्य ठरविण्यात आले आहे.महाराष्ट्र राज्यातील महाविकास आघाडीमध्ये,सांगली लोकसभा मतदारसंघाबाबतीत काँग्रेस पक्ष व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांच्यामध्ये उमेदवारीचा तिढा कायम असून,सांगलीच्या बाबतीत दोन्ही पक्षांना मान्य होईल असा सन्मानजनक तोडगा दिल्लीतून निघेल असे महाविकास आघाडीच्या सूत्रांनी सांगितले असल्याचे वृत्त आहे.एकंदरीत आज महाराष्ट्र राज्यात दुसऱ्या टप्प्यातील विदर्भ व मराठवाडा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांचे अर्ज भरताना,सर्वपक्षीयांनी मोठे शक्ती प्रदर्शन करून एकप्रकारे राजकीय वातावरण ढवळून काढून रंगत आणली आहे.