-सिद्धगिरी हॉस्पिटल,कणेरी आंतरराष्ट्रीय न्युरो सर्जरीच्या नकाशावर.!
जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अजित निंबाळकर)
इस्तांनबुल,तुर्की येथे पार पडलेल्या ऐतिहासिक अशा यासर्गील माक्रो न्युरो सर्जरी काँग्रेस येथे डॉ.शिवशंकर मरजक्के यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर विशेष आमंत्रित केले होते.या परिषदेत डॉ. मरजक्के यांनी मेंदु मधल्या अंत्यत जटील आणि जीवघेण्या अशा मेंदूच्या एन्युरीझम शस्त्रक्रियेवर शोध निबंध सादर केला.या ऐतिहासिक परिषदेला मायक्रो न्युरो सर्जरीचे जनक म्हणून विख्यात असणारे डॉ. प्रो. गाझी यासरगील स्वतः उपस्थित होते.याच परिषदेत त्यांचा ९९ वा जन्मदिन साजरा करण्यात आला. या परिषदेला ४८ देशातील निवडक एक हजार न्युरो सर्जन यांना आमंत्रित करण्यात आले होते.भारतातून केवळ दहा न्युरो सर्जनची निवड या परिषदेसाठी करण्यात आली होती, त्यात सर्वात तरुण भारतीय न्युरो सर्जन म्हणून डॉ. शिवशंकर मरजक्के यांची निवड झाली होती.
या परिषदेमध्ये भारतातल्या कणेरी सारख्या एका ग्रामीण भागात कार्यरत असणा-या हॉस्पीटल मध्ये इतक्या जटील आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शस्त्रक्रिया होतात याचे जगभरातील प्रख्यात न्युरो सर्जननी आश्चर्य आणि कौतुक केले.या परिषदेतील यशामुळे सिद्धगिरी हॉस्पीटल आणि रिसर्च सेंटर येथील न्यूरो विभाग आंतरराष्ट्रीय न्युरो सर्जरीच्या नकाशावर ठळकपणे आले आहे.सध्या देश आणि विदेशातून तरूण न्युरो सर्जन कणेरी येथे डॉ. मरजक्के यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्यासाठी (फेलोशिप ) येत आहेत.काही काळापूर्वी येमेन येथील डॉक्टर्स हि अनुभव म्हणून चार महिने सिद्धगिरी हॉस्पीटल आणि रिसर्च सेंटर येथे कार्यरत होते.परिषदेच्या काळात बऱ्याचश्या विकसनशिल देशा मधून रुग्णांना सिद्धगिरी हॉस्पीटल आणि रिसर्व सेंटर येथे शस्त्रक्रियेसाठी विचारणा आली. भविष्यात यातून सिद्धगिरी हॉस्पीटल आणि रिसर्च सेंटर हे आरोग्य पर्यटनाच्या आंतरराष्ट्रीय नकाशावर आपली विशेष ओळख निर्माण करेल. वाजवी दरात अत्यंत जटील अशा शस्त्रक्रिया डॉ. शिवशंकर मरजक्के, डॉ. रितेश भल्ला, डॉ. प्रकाश भरमगौडर डॉ. निशाद साठे, डॉ, स्वप्निल वळीवडे आणि त्यांच्या टिम ने गेल्या १० 'वर्षात हजारोवर शस्त्रक्रिया केल्या आहेत.
त्यांच्या या कार्याची दखल घेवूनच ग्रामीण भागात आरोग्य सेवा देणारी एकमेव संस्था म्हणून त्यांची निवड झाल्याने सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचले आहे. अत्यंत माफक दर, कुशल टिम, आंतरराष्ट्रीय दर्जाची अद्यावत उपकरणे, स्वतंत्र न्युरो आय.सी.यु. (ICU) यामुळे अत्यंत चांगल्या परिणामासाठी डॉ. शिवशंकर मरजक्के यांची ख्याती आहे. कोल्हापूर विमान तळाचा विस्तार, निसर्गरम्य आणि अध्यात्मिक वातावरण, माफक दर यामुळे सिद्धगिरी हॉस्पिटल हे विकसनशील देशांसाठी आरोग्य पर्यटनाची संधी उपलब्ध करून देत आहे.
या परिषदेतील यशामुळे कोल्हापूर आणि सिद्धगिरी हॉस्पिटलच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. डॉ. शिवशंकर मरजक्के यांना चार ते पाच विकसित देशातून यापुढील आंतरराष्ट्रीय परिषदांसाठी विशेष मार्गदर्शनासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. तुर्की येथील या परिषदेसाठी परमपूज्य काडसिद्धेश्वर महास्वमिजींचे आशीर्वाद व मार्गदर्शन त्यांना लाभले. या परिषदेतील यशामुळे डॉ. मरजक्के यांचे कोल्हापूर व परिसरातील डॉक्टर्स, रुग्ण ,वैद्यकीय क्षेत्र आणि विविध सामाजिक संस्था अशा सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.