जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
सांगली परिसरात जोरदार पावसामुळे कृष्णा,वारणा व पंचगंगा तिन्ही नद्या ओव्हरफ्लो होऊन वाहत असून,बरेच रस्ते पाण्याखाली गेले असून सांगली जिल्ह्यातील रस्त्याचा छोट्या छोट्या अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे.रेल्वे मार्ग हा एकमेव पर्याय उपलब्ध आहे.दक्षिण पश्चिम रेल्वेच्या हुबळी विभागाने यशवंतपूर-निजामुद्दीन संपर्क क्रांति व यशवंतपूर-चंदिगड संपर्क क्रांति तसेच इतर 10 रेल्वे गाड्यांना उगारखुर्द व कुडची या दोन रेल्वे स्टेशनवर काही दिवसांसाठी थांबा मंजूर केला आहे.
सांगली जिल्हा नागरिक जागृती मंच तर्फे विनंती करण्यात येते की पूर परिस्थिती व जोरदार पावसाची स्थिती पाहता सांगली रेल्वे स्टेशनवर देखील गाडी 12629/12630 निजामुद्दीन-यशवंतपुर संपर्क क्रांति व गाडी 22685/22686 यशवंतपुर-चंडीगड संपर्क क्रांति या दोन्ही गाड्यांना एका महिन्यासाठी सांगली रेल्वे स्टेशनवर थांबा देण्यात यावा.त्याचप्रमाणे दोन्ही संपर्क क्रांती,गोवा एक्सप्रेस तसेच बेंगलोर-जोधपूर एक्सप्रेस, बेंगलोर-गांधीधाम एक्सप्रेस, अजमेर-मैसूर एक्सप्रेस व बेंगलोर-अजमेर एक्सप्रेस या सर्व गाड्यांना एका महिन्यासाठी किर्लोस्करवाडी रेल्वे स्टेशनवर थांबा द्यावा.ज्याप्रकारे दक्षिण पश्चिम रेल्वेच्या हुबळी विभागाने पूर परिस्थितीत लोकांना मदत केली त्याचप्रमाणे मध्य रेल्वेने देखील सांगली व किर्लोस्करवाडी स्टेशनवर थांबा देऊन अशा संकटकाळी लोकांना मदत करावी.
वरील गाड्यांचे सांगली व किर्लोस्करवाडी येथे मान्सून थांबण्याचे नोटिफिकेशन मध्ये रेल्वेने त्वरित काढावे अन्यथा सांगली व किर्लोस्करवाडी रेल्वे स्टेशनवर रेल रोको आंदोलनाचा इशारा सतीश साखळकर अध्यक्ष सांगली जिल्हा नागरिक जागृती मंच यांनी,श्रीराम करण यादव जनरल मॅनेजर,मध्य रेल्वे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई यांना निवेदनाद्वारे दिला आहे.