-जिल्ह्यातील तृतीयपंथीयांनी विविध योजनेचा लाभ घेण्यासाठी ओळखपत्र व प्रमाणपत्रासाठी नोंदणी करण्याचे आवाहन.
जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अजित निंबाळकर)
जिल्ह्यातील नोंदणी झालेल्या तृतीयपंथीयांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ देण्यात यावा व यासाठी शिबिरांचे आयोजन करावे असे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी निर्देश दिले.तसेच मतदान ओळखपत्र सर्व तृतीपंथीयांना देण्यात यावे. याबाबत जिल्हा प्रशासन कायम तृतीयपंथीयासोबत राहील असे त्यांनी सांगितले.नोंदणी झालेल्या तृतीयपंथीयांना शासकीय सर्व योजनांचा लाभ देण्याकरिता राज्यातील सर्व समावेशक धोरण २०२४ धोरणानुसार प्रशासकीय यंत्रणेला कार्यवाही करणेबाबत आदेश देण्यात आले.कौशल्य विकास मधून स्वयम रोजगार करण्याबाबत तृतीयपंथीयांनी पुढाकार घेऊन व्यवसाय सुरू करावे असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी यावेळी केले.
तृतीयपंथीय हक्काचे संरक्षण व कल्याण समितीची जिल्हास्तरीय बैठक शुक्रवारी सायंकाळी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या उपस्थितीत पार पडली.बैठकीमध्ये समाज कल्याण कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त व समितीचे सदस्य सचिव सचिन साळे यांनी उपस्थितांचे स्वागत करून मागील बैठकीचे इतिवृत्त वाचन केले. जिल्ह्यातील एकूण १६६ तृतीयपंथीयांचे नॅशनल पोर्टल फॉर ट्रांसजेंडर या पोर्टल वरती नोंदणी झाली असून सर्वांना तृतीयपंथीयांचे ओळखपत्र व प्रमाणपत्र देण्यात आले आहे, याबाबतचा आढावा घेण्यात आला.
जिल्हाधिकारी यांच्या हस्ते पुढील आठवड्यात २७ तृतीयपंथीयांना ओळखपत्र व प्रमाणपत्र देण्याबाबत नियोजन करण्यात आले.तृतीयपंथीयांना भेडसावणाऱ्या शैक्षणिक,आरोग्य समस्यांबाबत समितीमध्ये चर्चा झाली.या बैठकीस पोलीस विभाग,जिल्हा परिषद आरोग्य विभाग,महिला बालकल्याण विभाग,मैत्री संघटना तसेच समितीच्या सदस्या,समाज कल्याण कार्यालयाचे सदानंद बगाडे समाजकल्याण निरीक्षक उपस्थित होते.