जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अजित निंबाळकर)
जिल्ह्यातील ग्रामस्थांकडून आलेली निवेदने व विविध प्रश्नांवर वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली.यावेळी ग्रामस्थांनी सार्वजनिक तसेच वैयक्तिक स्तरावरील अडीअडचणींबाबत निवेदने सादर केली.या निवेदनांवर पालकमंत्री मुश्रीफ यांनी जिल्हा प्रशासनाला तातडीने प्रश्न सोडविण्याच्या सूचना केल्या.
यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे,महापालिका आयुक्त के.मंजुलक्ष्मी,मुख्य कार्यकारी अधिकारी एस.कार्तिकेयन, अति.जिल्हाधिकारी संजय शिंदे,निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली,जिल्हा पुनर्वसन अधिकारी वर्षा शिंगण,जिल्हा भूमी अभिलेख अधीक्षक शिवाजी भोसले उपस्थित होते.
बैठकीत जमीन,धरणातील गाळ काढणे,पेंशन,केएमटी मधील अनुकंपाचा विषय,अतिक्रमण नियमित करणे आदी प्रश्नांवर चर्चा झाली.यावेळी केएमटीमधील अनुकंपामधील प्रकरणे लवकर मार्गी लावून 15 जणांना नियुक्तीपत्रे एका आठवड्यात देण्याचे निर्देश त्यांनी दिले.तसेच यावेळी कोल्हापूर महानगरपालिके अंतर्गत येणारे शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम नवरात्रोत्सवापूर्वी पुर्ण करा असे निर्देशही त्यांनी दिले.याचबरोबर आनंदाचा शिधा लवकरात लवकर वाटप करा असे निर्देश जिल्हा पुरवठा अधिकारी यांना दिले.