जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अजित निंबाळकर)
लोककला आणि लोकपरंपरा जतन करण्यासाठी,भारतीय जनता पार्टी आणि भागीरथी महिला संस्था यांच्यावतीने खासदार महोत्सव अंतर्गत,झिम्मा फुगडी स्पर्धा आयोजित केली होती.त्यातून चुल-मुल रहाटगाडग्यात अडकलेल्या महिलांना मानाचे व्यासपीठ मिळाले.जिल्हयातील सुमारे १० हजार महिलांनी,भागीरथी संस्थेच्या झिम्मा फुगडी स्पर्धेत सहभाग दर्शवला.त्यातून आजचा दिवस या महिलांसाठी निखळ आनंदाचा आणि कलागुणांना वाव देणारा ठरला.
धनंजय महाडिक युवाशक्ती प्रेरित भागीरथी महिला संस्थेच्या माध्यमातून,गेल्या १४ वर्षापासून महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबवले जातात.शिवाय महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून दिली जाते.या महिलांना पारंपारिक लोककला, लोकगीते,लोकनृत्याची आवड निर्माण व्हावी आणि महाराष्ट्राच्या पारंपारिक लोककलेचा ठेवा पुढच्या पिढीपर्यंत जावा,या उद्देशानं दरवर्षी झिम्मा फुगडी स्पर्धेचे आयोजन केले जाते.यंदा रामकृष्ण मल्टिपर्पज लॉनमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या आणि ५ लाख रूपयांची बक्षिसे असलेल्या झिम्मा फुगडी स्पर्धेचे आयोजन केले होते.
या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी,जिल्हयातील सुमारे १० हजार महिला एकत्र आल्या.आज सकाळी १० वाजता या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा झाला.प्रारंभी खासदार धनंजय महाडिक,कोल्हापूर महापालिकेच्या प्रशासक के.मंजूलक्ष्मी, भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ.अरूंधती महाडिक, सौ.मंगल महाडिक,मंगलताई महाडिक,गोकुळच्या संचालिका सौ शौमिका महाडिक,क्रिना महाडिक,भाग्यश्री शेटके,सौ.वैष्णवी महाडिक,सौ.मंजीरी महाडिक,चॅनेल बी चे व्यवस्थापकिय संचालक पृथ्वीराज महाडिक,भिमा साखर कारखान्याचे चेअरमन विश्वराज महाडिक,युथ आयकॉन कृष्णराज महाडिक,ऑलिम्पिक पदक विजेता स्वप्निल कुसाळे यांचे आई-वडील,परिक्षक शाहीर राजू राऊत,प्रा. आनंद गिरी,लेखिका मंजुश्री गोखले,कलाशिक्षक सागर बगाडे यांच्या उपस्थितीत दिपप्रज्वलन करून,झिम्मा फुगडी स्पर्धेचं उद्घाटन झाले.
महिला आज आपल्या कर्तृत्वाच्या आणि गुणवत्तेच्या बळावर सर्वच क्षेत्रात अभिमानास्पद कामगिरी करत आहेत. मात्र या धकाधकीच्या जीवनात महिलांनी आपल्या शारिरीक आणि मानसिक आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे,असे मत आयुक्त के.मंजूलक्ष्मी यांनी व्यक्त केले. एवढया भव्य प्रमाणात झिम्मा फुगडी स्पर्धेचे आयोजन केल्याबद्दल त्यांनी सौ.अरूंधती महाडिक आणि खासदार धनंजय महाडिक यांचे अभिनंदन केले.तर पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारनं महिला,बांधकाम कामगार,शेतकरी,ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी विविध अनुदानाच्या योजना सुरू केल्या आहेत.राज्यातील महायुती सरकारनं मुख्यमंत्री लाडकी बहीणीसह विविध योजना सुरू करून सर्वसामान्यांंचे जीवन उंचावण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत महिलांनी महायुतीच्या पाठीशी रहावे,असे आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केले.ही स्पर्धा गेल्या १५ वर्षापासून अखंडपणे सुरू आहे.दरवर्षी या स्पर्धेद्वारे महिलांना त्यांच्या नेहमीच्या चक्रातून बाहेर पडून एक दिवस आनंद,उत्साह आणि जल्लोषात जावा, यासाठी ही स्पर्धा आयोजित करत असल्याचे सौ.अरूंधती महाडिक यांनी सांगितले.
दरम्यान आनंदीबाई या मालिकेतील इंद्रायणीची भूमिका करणार्या अभिनेत्री अनिता दाते-केळकर,दुर्गाची भूमिका करणार्या नम्रता प्रधान,जय तुळजाभवानी मालिकेतील पूजा काळे आणि जय मल्हार फेम देवदत्त नागे तसंच चित्रपट अभिनेत्री हेमल इंगळे,गुलाबी चित्रपटातील दिग्दर्शक अभ्यंग कुवळेकर,निर्मात्या शितल शानबाग, साडेतीन शक्तीपीठ मालिकेतील मयुरी कापडने,सन मराठी वाहिनीवरील तिकळी मालिकेतील पूजा ठोंबरे,मंजू कॉन्स्टेबल मालिकेतील मोनिका राठी,कल्याणी नंदकिशोर, ॠतुजा कुलकर्णी या प्रसिध्द कलाकारांनी स्पर्धेला उपस्थिती लावून महिलांशी संवाद साधला.
यावेळी सौ.अरूंधती महाडिक,सौ.वैष्णवी महाडिक,सौ. मंजीरी महाडिक,यांच्यासह कलाकारांनी सुध्दा,झिम्मा आणि फुगडीचा फेर धरला.सकाळी अकरानंतर स्पर्धेला सुरवात झाली.वेगवेगळ्या गटानुसार झिम्मा आणि फुगडीच्या स्पर्धा रंगल्या.झिम्मा,घागर घुमवणे,उखाणे,सूप नाचवणे,काटवट काणा,छुई फुई,जात्यावरील ओव्या, फुगडी,घोडा घोडा,पारंपारिक वेशभूषा अशा प्रकारांच्या स्पर्धांमध्ये सहभागी होत महिलांनी विविध कलाविष्कार सादर केले.काही महिलांनी लेझिमचं उत्तम सादरीकरण केले.स्पर्धेमध्ये ७ वर्षाच्या मुलीपासून ते ७० वर्षाच्या आजीपर्यंत सर्वांनीच अत्यंत उत्साहात आणि जल्लोषात सहभागी होवून स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटला.त्यावेळी सौ. वैष्णवी महाडिक यांनी सुध्दा लेझिम खेळाचा मनसोक्त आनंद घेतला.
सायंकाळच्या सत्रात नवरा माझा नवसाचा फेम प्रसिध्द अभिनेते सचिन आणि सुप्रिया पिळगावकर यांनी झिम्मा फुगडी स्पर्धेला उपस्थिती लावली.महिलांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले.यावेळी नवरा माझा नवसाचा-२ या चित्रपटाबाबत सचिन आणि सुप्रिया पिळगावकर यांनी माहिती देत,उपस्थित महिलांचं मनोरंजन केलं.महिलांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात रंगलेल्या पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या आणि भव्य झिम्मा फुगडी स्पर्धेचं बक्षिस वितरण रात्री उशीरा करण्यात आले.तोडकर संजीवनी नैसर्गीक आयुर्वेदिक उपचार आणि केरळीय पंचकर्म सेंटरचे जनरल मॅनेजर सुभाष शारबिद्रे हे मुख्य प्रायोजक,तर सहप्रायोजक कराडच्या जिजाई मसाले कंपनीच्या वैशाली भोसले यांची स्पर्धेला विशेष उपस्थिती होती.