जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राष्ट्रीय संघटक श्याम मानव हे अंधश्रद्धा निर्मूलनाच्या नावाखाली संत ज्ञानेश्वर महाराज,संत तुकाराम महाराज,संत गजानन महाराज आदी अनेक संतांवर सातत्याने जातीयवादी आणि आक्षेपार्ह टीका करत असतात.समस्त वारकर्यांच्या धार्मिक भावना दुखावणार्या श्याम मानव यांची जादूटोणा कायद्याच्या शासकीय समितीतून तात्काळ हकालपट्टी करावी,तसेच संभाजी ब्रिगेडच्या राज्यस्तरीय अधिवेशनात प्रभु श्रीराम आणि श्री स्वामी समर्थ यांच्याविषयी आक्षेपार्ह टीका केल्याप्रकाणी ज्ञानेश महाराव यांना तात्काळ अटक करावी,अशी मागणी समस्त वारकरी संप्रदायाने आज आंदोलनाच्या माध्यमातून केली.समस्त वारकरी संप्रदायाच्या वतीने आज सायंकाळी चाकण चौक,आळंदी येथे जनआंदोलन घेण्यात आले.या वेळी मागण्याचे फलक घेऊन महिला आणि पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ज्ञानेश महाराव यांच्या विरोधात पोलीस तक्रार दाखल.!
त्याचबरोबर ज्ञानेश महाराव यांच्या विरोधात वारकरी संप्रदायांच्या वतीने आळंदी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.राष्ट्रीय वारकरी परिषदेचे कार्याध्यक्ष ह.भ.प.बापू महाराज रावकर यांनी ज्ञानेश महाराव यांच्या विरोधात ही तक्रार केली.यावेळी पोलीस उपनिरीक्षक नरके यांनी तक्रार प्रविष्ट करून या प्रकरणाची २ दिवसांत चौकशी करण्यात येईल,असे सांगितले.या वेळी गोरक्षक श्री.गणेश हुलावले,समर्थक ज्ञानपिठाचे ह.भ.प. महेंद्र महाराज मस्के महाराज,श्री.प्रसाद जोशी,‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’चे ह.भ.प. चोरघे महाराज,‘आध्यात्मिक आघाडी’चे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष ह.भ.प.संजय महाराज उंदरे पाटील, ह.भ.प.राममहाराज सूर्यवंशी आणि ‘हिंदु जनजागृती समिती’चे श्री.पराग गोखले हे उपस्थित होते.
आळंदी येथील वारकरी आंदोलनाच्या वेळी ह.भ.प.महेंद्र महाराज मस्के म्हणाले,‘जादूटोणाविरोधी शासकीय समितीचे उपाध्यक्ष श्याम मानव यांची सरकारने त्वरित हकालपट्टी करावी.श्याम मानव हे मानव आहेत कि दानव.? अशा व्यक्तीची मुख्यमंत्र्यांनी शासकीय समितीतून विलंब न करता ४८ तासांच्या आत हकालपट्टी करावी.आमच्यावर पुन्हा आंदोलन करण्याची वेळ येऊ नये.यावेळी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’चे ह.भ.प.दत्तात्रय महाराज चोरघे म्हणाले की,ज्ञानेश महाराव यांनी प्रभु श्रीराम आणि श्री स्वामी समर्थ यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करून हिंदु देवता आणि संत यांचे विडंबन करून समस्त हिंदूच्या भावना दुखावल्या आहेत.वारकरी संप्रदाय हा जरी सहिष्णू असला तरी तुकाराम महाराजांनी '...नाठाळाचे माथी हाणू काठी।’ असे म्हटलेले आहे.ज्ञानेश महाराव यांच्या शेजारी एक मोठे नेते बसले होते त्यांनीही या गोष्टीला मूक संमती दिली होती. त्यामुळे आम्ही त्यांचाही निषेध करत आहोत.
ह.भ.प.बाळासाहेब थोरात म्हणाले की,हिंदू देवी-देवतांविषयी वादग्रस्त वक्तव्य करून हिंदु देवता आणि संत यांचे विडंबन करणार्या ज्ञानेश महाराव यांच्यावर कठोर कारवाई करावी.प्रशासनाने याची दखल न घेतल्यास याहीपेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल.‘राष्ट्रीय वारकरी परिषदे’चे कार्याध्यक्ष ह.भ.प.बापू महाराज रावकर म्हणाले की,ज्ञानेश्वर माऊलींच्या या पुण्यभूमीमधून आम्ही या नतद्रष्टांचा धिक्कार करत आहे.आम्हाला आज रस्त्यावर उतरावे लागले आहे ही अत्यंत खेदाची बाब आहे,याचा अर्थ शासनाने लक्षात ठेवावा आणि आमच्या धार्मिक भावना दुखावणार्यांवर कठोर कारवाई करावी.या वेळी ह.भ.प. बाजीराव महाराज बांगर म्हणाले की,तमाम वारकरी करून ज्ञानेश महाराव यांच्या वक्तव्याचा आम्ही जाहीर निषेध करतो.संपूर्ण वारकरी संप्रदायाच्या वतीने शासनाची मागणी आहे की,आमच्या आराध्य देवतांवर टीका करण्याचा अधिकार कुणालाही दिलेला नाही.
श्याम मानव यांनी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने आयोजित जादूटोणा कायद्याच्या जनजागृती कार्यक्रमात ‘ज्ञानेश्वरांनी रेड्यामुखी वेद वदवले,हे धादांत खोटे सांगितले जात आहे’,अशा प्रकारची अनेक वादग्रस्त विधान केले होते. यापूर्वीही ‘कुलकर्ण्यांचं १२ वर्षांचं पोरं (संत ज्ञानेश्वर महाराज) भिंत काय चालवणार?’, ‘संत तुकाराम महाराज हे सदेह वैकुंठाला गेले नसून त्यांचा खून झाला आहे’, अशा प्रकारची वारकर्यांसह महाराष्ट्राच्या धार्मिक भावना दुखावणारी अनेक आक्षेपार्ह आणि जातीयवादी विधाने करत असतात.हा नेमका कोणत्या जादूटोणा कायद्याचा प्रचार आहे?असा प्रश्नही या वेळी आंदोलनातून शासनाला विचारण्यात आला.