जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका जवळपास दिवाळीनंतर होण्याचे स्पष्ट संकेत मिळाले असून,आज मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्यातील 11 राजकीय पक्षांशी चर्चा केली आहे.
दरम्यान महाराष्ट्र राज्यातील निवडणुकांच्या तारखा जाहीर करताना येणाऱ्या सणावारांची काळजी घेण्यात यावी असे सूचना केली असल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिली आहे.आज मुंबई येथे झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी,वरील महाराष्ट्र राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीबाबत निवडणूक प्रशासनाची भूमिका स्पष्ट केली.आगामी होणाऱ्या विधानसभेतील उमेदवारांना आपल्या गुन्हेगारी स्वरूपांची पार्श्वभूमी जर असेल तर ती वर्तमानपत्रात माहितीसह द्यावी लागणार असून,तसेच राजकीय पक्षांना देखील सदरहू उमेदवारास उमेदवारी का दिली.? याचे स्पष्टीकरण द्यावे लागणार आहे.
दरम्यान महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाल हा दि.26 नोव्हेंबर 2024 रोजी संपत असून,त्या अनुषंगाने मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार व निवडणूक आयुक्त एस एस संधू यांचे सह महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीचा आढावा व तयारीची पाहणी करण्यासाठी दोन दिवसीय दौरा केला आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी महाराष्ट्र राज्यातील राजकीय पक्षांना देखील काही महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत.तसेच विधानसभेच्या निवडणुकीतील उमेदवारास असणारी खर्चाची 40 लाख रुपये मर्यादा, कायम राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.एकंदरीतच महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणुकीची दंगल ही दिवाळीनंतर पहावयास मिळण्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत.