जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अजित निंबाळकर)
कोल्हापूर जिल्हयातील कागल तालुक्यात मौजे सांगाव येथे नवीन शासकीय होमिओपॅथी आणि रुग्णालय स्थापन करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.कोल्हापूर जिल्ह्यातील मौजे सांगाव येथे १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय होमिओपॅथी महाविद्यालय व संलग्न ५० रुग्ण खाटांचे होमिओपॅथी रुग्णालय स्थापन करण्यात येईल.त्यासाठी ४ एकर सुयोग्य जागा उपलब्ध करून देण्यात येईल.या महाविद्यालयासाठी २४८ कोटी ९० लाख रुपये इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली.
मा.मंत्री (वैद्यकीय शिक्षण) यांच्या अध्यक्षतेखालील समितीमार्फत नवीन शासकीय होमिओपॅथी महाविद्यालय व संलग्नित रुग्णालय यांसाठी मौजे सांगाव,ता.कागल येथील निकषानुसार व सुयोग्य जागा (किमान ४ एकर) निश्चित करुन ती जागा महसूल विभागाच्या सहमतीने तसेच जिल्हाधिकारी,कोल्हापूर यांच्यामार्फत निःशुल्क उपलब्ध करून घेण्यासही मान्यता यावेळी देण्यात आली.तसेच त्या जागेत नवीन शासकीय होमिओपॅथी महाविद्यालय व रुग्णालय स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली.नवीन शासकीय होमिओपॅथी महाविद्यालय व रुग्णालयासाठी प्रस्तावित केल्याप्रमाणे शासन मान्यतेने वेळोवेळी आवश्यक तेवढी पदनिर्मिती करण्यास आणि पदे भरण्यास मान्यता देण्यात आली आहे.नवीन शासकीय होमिओपॅथी महाविद्यालयासाठी एकूण रुपये २४८.९० कोटी (अनावर्ती खर्च रुपये १४०.३८ कोटी व पहिल्या पाच वर्षांकरिता आवर्ती खर्च रुपये १०८.५२ कोटी) इतका खर्च अपेक्षित असून आवश्यक निधी उपलब्ध करुन त्याप्रमाणे खर्चास मान्यता मिळाली.तसेच, पाचव्या वर्षानंतर पुढील प्रत्येक वर्षी आवश्यक आवर्ती खर्चासाठी प्रति वर्ष सुमारे रूपये २३.३६ कोटी इतका निधी उपलब्ध करून देवून त्याप्रमाणे खर्चास मान्यता मिळाली आहे.
जिल्ह्यातील मौजे सांगाव,ता.कागल येथे १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व संलग्नित ५० रुग्णखाटांच्या आयुर्वेद रुग्णालयास पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या पाठपुराव्याने मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली आहे. आयुर्वेदाचा पायाभूत सिध्दांत ‘स्वास्थस्य स्वास्थ्य रक्षणम्’ साध्य करण्यासाठी राज्यातील आरोग्य सेवेतील आयुर्वेद तज्ज्ञांची आवश्यकता लक्षात घेऊन कागल येथे १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व संलग्नित ५० रुग्णखाटांचे आयुर्वेद रुग्णालय स्थापन करण्याची आज मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली.केंद्र शासनाच्या व भारतीय चिकित्सा पद्धती राष्ट्रीय आयोग नवी दिल्ली यांच्या मान्यतेच्या अधीन राहून कागल येथे शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व संलग्न रुग्णालय स्थापन करण्यास शासनाने मान्यता देण्यात आली असल्याचे पालकमंत्री श्री.मुश्रीफ यांनी सांगितले.या महाविद्यालयासाठी विविध संवर्गातील पदे अंदाजपत्रकीय तरतूद करुन विहित मार्गाने निर्माण करण्यास व भरण्यास परवानगी देण्यात आली.
आयुर्वेदाच्या प्रचार प्रसारासह अर्थिकदृष्ट्या मागास गुणवंत विद्यार्थ्यांना होणार फायदा - वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ.
आयुर्वेदाचा विकास मागील 20 वर्षात वेगाने झाल्याचे दिसुन येत असून आयुर्वेदाकडे बघण्याचा सामान्य जनतेच्या दृष्टीकोनातही अमुलाग्र बदल होताना दिसत आहे.आयुर्वेद महाविद्यालये राज्याच्या विविध विभागात स्थापित केल्यास समाजाचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी तर मदत होईलच,त्या सोबत आयुर्वेदाचा प्रचार प्रसार संपूर्ण राज्यात होवून रोजगाराच्या चांगल्या संधी प्राप्त होतील.अर्थिकदृष्ट्या मागास गुणवंत विद्यार्थ्यांनाही शासकीय संस्थांमध्ये प्रवेश मिळण्यास मदत होईल असे मत वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री कोल्हापूर हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केले.