राज्यातील गरजूंपर्यंत प्रबोधनातून शासकीय योजनाही पोहोचवाव्यात- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.--!

0

-कणेरी मठ येथील संत समावेश कार्यक्रमात उपस्थित प्रबोधनकारांना आवाहन.

-देशी गायींना पालनपोषणासाठी प्रत‍ि दिन 50 रू.आणि राज्य मातेचा दर्जा दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचा विशेष सन्मान.

जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क. 

(अजित निंबाळकर)

कोल्हापूर, : राज्य शासनाने गोरगरीबांसाठी,महिलांसाठी तसेच जेष्ठांसाठी, शेतकरी,विद्यार्थ्यांसाठी महत्त्वकांक्षी योजनांमधून त्यांच्या स्वप्नांना बळ देण्याचे काम केले.अशा या योजना राज्यातील गरजूंपर्यंत पोहोचवण्याचे कार्य आपल्या प्रबोधनातून करावे असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित प्रबोधनकारांना केले.कोल्हापूर येथील श्री क्षेत्र सिद्धगिरी महासंस्थान,कणेरी मठ येथे आयोजित संत समावेश कार्यक्रमाच्या समारोपीय चर्चासत्रात बोलत होते.ते म्हणाले, समाजाला जागृत करण्याचे कार्य हजारो प्रबोधनकार करीत असतात.समाजाला दिशा देण्याचे कार्य आपण पार पाडत असताना समाजातील प्रत्येक कुटुंबासाठी शासनाने सुरू केलेल्या महत्त्वकांक्षी योजनाही पोहचल्या तर त्या प्रत्येक कुटुंबाला आधार मिळेल.या कार्यक्रमावेळी मंचावर कणेरी मठाचे अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी,ह.भ.प.राणा वास्कर,रामगिरी महाराज, निरंजन महाराज,विश्वस्त माणिक मोरे आदि मान्यवर उपस्थित होते.

गोमातेचं सरंक्षण केले पाहिजे असे सांगून गोशाळांमधील देशी गायींच्या पालन-पोषणासाठी प्रति दिन, प्रति गाय ५० रुपये अनुदान योजना राबवण्याचा निर्णय शासनाने नुकताच घेतला असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.भारतीय संस्कृतीत गायीचे अनन्यसाधारण महत्व आहे,देशी  गायीला राज्य माता- गोमाता घोषित करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. राज्य शासनाने लोककल्याणकारी  अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहेत.जसे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना,मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना,जेष्ठ नागरिकांच्या योजना, शेतकऱ्यांच्या योजना अशा विविध योजना शासनाने सुरु केल्या आहेत. हे राज्य शेतकऱ्यांच,बळीराजाचं,वारकऱ्यांचं कष्टाकरी, कामगारांचं,माता भगिनींचं,जेष्ठांचं आहे.हे शासन सर्व सामान्यांच्या हितासाठी काम करणारं आहे असे सांगून शासकीय कार्यालयात लोकांची कामे प्रलंबित राहू नये, म्हणून शासनाने शासन आपल्या दारी योजना सुरु केली आणि या योजनेतून 5 कोटी लोकांनी लाभ घेतला आहे.  

मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले,जनताच माझी ताकद असून त्यांच्यासाठी काम करणारा मी सर्वसामान्य माणूस आहे. त्यांच्यासाठी अनेक योजना तर सुरूच केल्याच त्याचबरोबर आता आपण पर्यावरण संरक्षण,तापमान वाढीवरील नियंत्रण,सेंद्रीय शेती अशा अनेक माध्यमातून काम करूया. या कार्यक्रमात त्यांचा देशी गायींना पालनपोषणासाठी प्रत‍ि दिन 50 रू.आणि देशी गायींना राज्य मातेचा दर्जा दिल्याबद्दल विशेष सन्मान तुळसीचा हार देवून व गोमाता दान करून करण्यात आला.कार्यक्रम संपल्यानंतर त्यांनी उपस्थित सर्व प्रबोधनकार,स्वामी,ह.भ.प.यांची निवेदने स्विकारली तसेच सोबत बसून विविध विषयांवर चर्चा केली.उपस्थित महिला प्रबोधनकरांनी त्यांचे औक्षणही यावेळी केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कोल्हापूर विमानतळ येथे जिल्हा प्रशासनाकडून स्वागत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कोल्हापूर विमानतळ येथे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.यावेळी महापालिका आयुक्त के.मंजुलक्ष्मी,मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस.,खासदार धैर्यशील माने,इचलकरंजी महापालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे,प्रभारी पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे,माजी खासदार संजय मंडलिक,माजी आमदार चंद्रदीप नरके उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top