जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
परवाना नूतनीकरणासाठी शासनाने लावलेला दंड रद्द करावा म्हणून आपण रस्त्यावर उतरून आंदोलन केले. विधीमंडळात दंडाला स्थगिती मिळाली.मला सांगलीचा आवाज म्हणून विधानसभेवर पाठवला तर दंड कायमचा रद्द करण्यासाठी आणि शासन दरबारी व आरटीओ कार्यालयातील आपले प्रश्न केवळ रिक्षा मालक- चालक म्हणून नव्हे तर माझे जीवाभावाचे सहकारी मित्र म्हणून प्राधान्याने मांडून तुम्हाला न्याय मिळवून देणार..इतर वाहनांच्या अपघातांच्या तुलनेत रिक्षांच्या अपघाताचे प्रमाण ०.५% आहे.त्यामुळे रिक्षांना इन्शुरन्स माफ करणे,बांधकाम कामगार योजनेसारखी योजना रिक्षा चालकांना लागू करणे, आरटीओ कार्यालयात एकाच छताखाली रिक्षावाल्यांची कामे व्हावीत,धंदा वाढावा यासाठी सांगलीचा पर्यटन स्थळ म्हणून विकास करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असे प्रतिपादन पृथ्वीराज पाटील यांनी केले.संवाद सांगलीसाठी या उपक्रमांतर्गत मराठा सेवा संघाच्या हाॅल मध्ये स्वराज्य रिक्षा संघटनेच्या व मनपा हद्दीतील रिक्षा मालक व चालक यांच्याशी संवाद साधताना ते बोलत होते.
पृथ्वीराजबाबा पुढे म्हणाले, 'रिक्षा चालक हे अत्यंत प्रामाणिकपणे प्रवाशांना मदत करतात,त्यांच्या जीवाची काळजी करतात.रिक्षा कल्याणकारी मंडळाची अंमलबजावणी होण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार आहे.सर्व रिक्षा संघटनांनी आपल्या प्रश्नासाठी एक व्हा.. मी तुमचा आवाज बनून तुमचाच प्रतिनिधी म्हणून विधीमंडळात न्याय मिळवून देण्यासाठी लढेन.'
संघटना अध्यक्ष रामभाऊ पाटील म्हणाले,'पृथ्वीराजबाबा हे कायम रिक्षा चालक मालकांच्या प्रश्नावर पाठिशी राहतात. संघटनेच्या कामासाठी त्यांनी दोन संगणक देण्याचे मान्य केले आहे.आंदोलनात पाचशेहून अधिक काळे झेंडे दिले.परवाना नूतणीकरणासाठी वित्त सहाय्य उपलब्ध करून दिले.आमचे प्रश्न सोडवण्यासाठी ते सक्षम आहेत. रिक्षा चालक व मालकांचे प्रश्न सोडविण्यासाठी ते आपल्या पाठिशी खंबीर आहेत.त्यांना साथ देऊ या.'
यावेळी आनंद पाटील,हणमंत कटनाळे,मुन्ना बागवान,राजू शितोळे,सुनील पवार मुहम्मद खाणली,रमेश सावंत,अमीर मुजावर,चंद्रकांत,योगेश कोळी,कृष्णा साळुंखे,लक्ष्मण कांबळे,अय्याज मुजावर,शकील सय्यद,जितेंद्र कदम, कैलास शिंदे,पैगंबर कुमठे,सलिम कुरणे इ.रिक्षा चालकांनी शेतकऱ्यासारखे एक रुपया विमा योजना लागू करावी, परवाना नूतणीकरण दंड रद्द व्हावा,पोलिसांचा त्रास बंद करावा,रिक्षा चालक व मालकांना सन्मानाची वागणूक मिळावी,एकेरी वाहतूक ठिकाणी जास्त वेळ ट्राफिक पोलीस असावा,रिक्षा भवन व्हावे,सीएनजी पंप चालू करावेत,मनपा हद्दीत नवीन उद्योग सुरु व्हावेत,वैद्यकीय मदत मिळावी, विना परवाना रिक्षा व्यवसाय बंद करावा,इंजिन बदलून १५ वर्षानंतरही नूतणीकरण करावे इ.मागण्या केल्या.
या महत्त्वाच्या मागण्या मान्य होण्यासाठी आपलाच बांधव म्हणून विधीमंडळाच्या माध्यमातून शासनाकडे तुमची कैफियत मांडणार त्यासाठी आपली साथ द्या असे आवाहन पृथ्वीराज यांनी केले.यावेळी स्वराज्य रिक्षा संघटनांचे पदाधिकारी व सदस्य आणि महापालिका हद्दीतील रिक्षा मालक व चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.