जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
देशातील नवरात्रोत्सव हा श्री.आदिशक्तीच्या उपासनेचा, मांगल्याचा आणि पावित्र्याचा सण आहे;पण आज देशभरात वाढत असलेले महिलांवरील अत्याचार,लाखोंच्या संख्येने महिला बेपत्ता होणे,‘लव्ह जिहाद’च्या माध्यमातून हिंदू युवतींना लक्ष्य करणे आदी अनेक प्रकार मोठ्या प्रमाणात उघडकीस येत आहेत.त्यामुळे नवरात्रोत्सवामध्ये लव्ह जिहाद्यांपासून महिलांची सुरक्षितता,तसेच उत्सवांचे पावित्र्य जपणे आवश्यक आहे.म्हणूनच ज्यांना मूर्तीपूजा मान्य नाही, अशांना नवरात्रीमध्ये देवीच्या मूर्तीसमोर गरबा खेळण्यासाठी प्रवेश देऊ नये.गरबा हा हिंदूंचा धार्मिक सण आहे.हिंदू देवतांवर श्रद्धा असणार्यांनीच तेथे यावे.जे मूर्तीपूजा न मानणारे गरब्यात शिरण्याचा प्रयत्न करतात, त्यातून पुढे ‘लव्ह जिहाद’चा धोकाही निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ‘लव्ह जिहाद’ रोखण्यासाठी आणि उत्सवाचे पावित्र्य जपण्यासाठी गरब्यात केवळ हिंदूंनाच प्रवेश द्यावा,असे आवाहन हिंदु जनजागृती समितीने नवरात्रीनिमित्त गरबा आयोजन करणार्या सर्व आयोजकांना केले आहे.
या संदर्भात गुजरात,मध्यप्रदेश राज्यांसह महाराष्ट्र,सोलापूर जिल्ह्यांतील पोलिसांनी महिलांची सुरक्षेसाठी प्रत्येकाचे आधारकार्ड पाहून प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे,त्याचे आम्ही मनापासून स्वागत करतो; मात्र हा नियम केवळ काही राज्ये वा जिल्ह्यांत नव्हे,तर संपूर्ण देशभरात लागू केला पाहिजे.आज देशभरात बेकायदेशीररित्या घुसखोरी केलेल्या बांगलादेशी आणि रोहिग्या मुसलमानांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.या घुसखोरांचा गुन्हेगारी कृत्यांमध्ये सहभाग असल्याचे सुरक्षा यंत्रणांना आढळून आले आहे.हे अतिशय गंभीर असून नवरात्रोत्सवामध्ये काही घातपात करण्याच्या दृष्टीने प्रयत्न होऊ शकतो.त्यामुळे गरबा आयोजकांनी हा विषय गंभीरतेने घ्यायला हवा.
ज्या अहिंदूंना नवरात्रीमध्ये गरब्यात सहभागी व्हायचे असेल,तर प्रथम श्रद्धेने विधीवत प्रथम हिंदु धर्म स्वीकारावा. हिंदु देवतांची पूजाअर्जा करावी.तिलकधारण करून मग गरबोत्सवात सामील व्हावे.एरवी गणेशोत्सव,रामनवमी आदींच्या मिरवणुका निघतात,त्या वेळी चुकून अंगावर गुलाल पडला किंवा मोठ्या आवाजात लाऊड स्पीकर्स लावले अशा कारणांमुळे दंगली घडवणारे नवरात्रीच्या गरब्यात आनंदाने कसे काय सहभागी होतात,हा प्रश्न निर्माण होतो.त्यामुळे कोणत्या हेतूने अहिंदु गरब्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतात,हे महत्त्वाचे आहे,याकडेही समितीने लक्ष वेधले.
नवरात्री म्हणजे नऊ दिवस देवीची भक्तीभावाने करायचे व्रत असून त्याचे पावित्र्य जपणे आवश्यक आहे.सध्या नवरात्रीमध्ये चित्रपटांतील अश्लील गाणी लावणे,त्यांवर हिडीसपणे नाचणे,महिलांची छेडछाड करणे,तोकडे कपडे घालून गरब्यात सहभागी होणे आदी प्रकार होतात.यांतून महिलांची सुरक्षितता धोक्यात येऊ शकते,त्यामुळे हे आपण टाळले पाहिजे.तसेच उत्सवांचे बाजारीकरण राेखण्यासाठीही प्रयत्न करायला हवेत,असेही समितीने म्हटले आहे.